महापालिका अधिकाऱ्यांचे वाभाडे 

महापालिका अधिकाऱ्यांचे वाभाडे 

नवी मुंबई - विकासकामांचा पाठपुरावा करायला गेलेल्या नगरसेवकांना अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या वाईट वागणुकीविरोधात अनेक महिने मनात खदखदत असलेली नाराजी बुधवारी महासभेच्या कामकाजात बाहेर आली. अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांना दिली जाणारी वागणूक आणि विकासकामांतील पक्षपात याबाबत काँग्रेसच्या नगरसेविका अंजली वाळुंज यांनी लक्षवेधी मांडून अधिकाऱ्यांचे अक्षरशः वाभाडे काढले.

‘महापालिकेला कर भरणाऱ्या नागरिकांची कामे घेऊन आम्ही अधिकाऱ्यांकडे जातो; घरातील नाही’ अशा शब्दांत अधिकाऱ्यांना खडसावून सचिव विभागातही टक्केवारीसाठी कामे अडकवून ठेवली जा२तात, असा आरोप करून हप्तेवसुली करण्यासाठी वाशी विभाग कार्यालयातील सफाई कामगार अनिल पाटील फिरत असल्याचे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांची पोलखोल केली. शिक्षण विभागातील लिपिक विठ्ठल कराड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आरोग्य, उद्यान, सचिव व अभियांत्रिकी विभागातील कामकाजावर त्यांनी ताशेरे ओढले.

अधिकाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याची तक्रार अनेक दिवसांपासून सर्व पक्षांचे नगरसेवक करत होते. मात्र तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसच्या पक्षप्रतोद अंजली वाळुंज यांनी लक्षवेधी मांडून समस्यांचा पाढा वाचला. विकासकामे करताना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या हीन वागणुकीचा अनुभव उपमहापौर अविनाश लाड यांनाही आल्याचे वाळुंज यांनी सांगितले. वाशीत अधिकृत ठिकाणी विजेच्या दिव्याचे खांब बसवण्याची मागणी केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून बेकायदा ठिकाणी ते बसवले. नाल्यात ग्रील बसवले; पण त्याची नगरसेवकांना माहितीच नाही, असे सांगत अभियंत्रिकी विभागाच्या कामावरही त्यांनी ताशेरे ओढले. 

कीटकनाशक व धूरफवारणी केली जात नाही. याबाबत संबंधित अधिकारी उज्ज्वला ओतूरकर यांना फोन केला, तर त्या घेत नसल्याची तक्रार त्यांनी केली. शिक्षण विभागातून अग्निशमन दलात बदली केल्यानंतरही विठ्ठल कराड हा लिपिक शिक्षण विभागातच काम करत असल्याचे वाळुंज यांनी दाखवून दिले. अनेक दिवसांपासून कार्यालयात संगणक देण्याची मागणी सचिव विभागाकडे केली आहे; मात्र संगणक देणाऱ्या कंत्राटदाराकडे सचिव विभागाने मागितलेली टक्केवारी परवडत नसल्याने त्याने संगणक देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट वाळुंज यांनी केला. या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.   

अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचे तोंडसुख
काँग्रेसच्या पक्षप्रतोद अंजली वाळुंज यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात मांडलेल्या लक्षवेधीवर अनेक पक्षांच्या २५ नगरसेवकांनी त्यांच्या परिसरातील आलेले अनुभव व समस्या मांडल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या उदाहरणांसह तक्रारी केल्या.  

उपमहापौरांचे आरोग्य, शिक्षण विभागावर ताशेरे
आरोग्य विभागात मर्जीतील कर्मचाऱ्यांची वर्णी लावण्याचे काम सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे उपमहापौर अविनाश लाड यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. १७ वर्षे आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी महापालिका मुख्यालय सोडायला तयार नाहीत. त्यांना पुन्हा बढत्या दिल्या जात आहेत, असा आरोप लाड यांनी केला.  

पनवेलच्या नगरसेवकांची भेट
पनवेल महापालिकेतील शेकाप आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी गटनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेला भेट दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील प्रेक्षक गॅलरीत बसून त्यांनी सभागृहाचे कामकाज कसे चालते याची पाहणी केली. त्यानंतर महापालिका मुख्यालयाची पाहणीही त्यांनी केली.

निवडून आलेल्या नगरसेवकांचे अधिकाऱ्यांना ऐकावेच लागेल. जे अधिकारी नगरसेवकांचे फोन घेत नसतील त्यांना निलंबित करावे लागेल. लोकशाहीने लोकप्रतिनिधींना अधिकार दिले आहेत. लोकप्रतिनिधींचे न ऐकून लोकशाहीचा अपमान अधिकाऱ्यांनी करू नये. याची खबरदारी यापुढे घ्यावी.
- सुधाकर सोनवणे, महापौर

आम्ही पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध आहोत. महापालिकेत सुरू असलेल्या प्रत्येक कामाचा आढावा अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेत असतो. नगरसेवकांच्या तक्रारीनुसार प्रत्येक विभागात किती काम केले, याची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. विकासकामे वाढावीत, डॉक्‍टर, वैद्यकीय यंत्रणा खरेदी यासाठी माझेही प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी थेट निलंबितही करू शकतो; मात्र त्याने समस्या सुटणार नाही.   
- एन. रामास्वामी, महापालिका आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com