समुद्रातील प्रदूषणाला महापालिका जबाबदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबईत समुद्रातील प्रदूषण वाढत आहे. महापालिका प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडत असल्याने जलप्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या पालिकेवर कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट, गिरगाव आणि जुहू चौपाटी ही ठिकाणे सर्वाधिक प्रदूषित आहेत. या समस्येबाबत न्यायालयाने मध्यस्थी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

सिटिजन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन या सामाजिक संस्थेने वकील शहजाद नक्वी यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. या सर्व प्रभागांचे सर्वेक्षण केल्यानंतर इथे सर्वाधिक प्रमाणात जलप्रदूषण झाल्याचा निष्कर्ष काढल्याचा दावा याचिकेत केला आहे. मुंबईत समुद्रामध्ये सर्वाधिक जलप्रदूषण होत असल्याबाबत वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणेही सादर करण्यात आली आहेत. तसेच मरिन ड्राइव्ह येथील अस्वच्छतेच्या छायाचित्रांसोबत महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या (एमपीसीबी) मुंबई समुद्र किनाऱ्यावरील ठिकठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासून तयार केलेल्या अहवालाची प्रतही जोडण्यात आली आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी 30 जुलैला मुंबईत समुद्रात कुठलीही प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याच्या ठिकाणांची पाहणी केल्याचेही या याचिकेत नमूद केले आहे.