मालवणीतील पालिकेच्या शाळेची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मालाड - मालवणी गेट क्रमांक सातजवळील एमएचबी-एक आणि तीन येथील हिंदी प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. पडक्‍या भिंती व गळक्‍या छपराबरोबरच शाळेमागील गटार तुंबले असून, गटारातील पाणी शाळा परिसरात येत असल्याने शाळेतील ६०० विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

मालाड - मालवणी गेट क्रमांक सातजवळील एमएचबी-एक आणि तीन येथील हिंदी प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. पडक्‍या भिंती व गळक्‍या छपराबरोबरच शाळेमागील गटार तुंबले असून, गटारातील पाणी शाळा परिसरात येत असल्याने शाळेतील ६०० विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

मालवणी गेट क्रमांक सात येथील एमएचबी-एक आणि तीन क्रमांकाच्या पालिकेच्या हिंदी प्राथमिक शाळेमागील गटार तुंबल्याने गटारातील घाण पाणी शाळा परिसरात साचत आहे. यामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या ६०० विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. एकीकडे घाणपाण्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे प्राथमिक शाळेचे छप्पर गळत आहे; तसेच काही भिंतींचे प्लास्टरही तुटले आहे. तसेच शाळेतील बाकेही तुटलेली आहेत. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. पालिका शाळा प्रशासनाने मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्यास विद्यार्थी कंटाळून शाळांकडे पाठ फिरवण्याची शक्‍यता असल्याचे स्थानिक नागरिक प्रकाश जैस्वार यांनी प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली आहे.

शाळा दुरुस्तीसंदर्भात दोन वर्षांपूर्वी पालिका सहायक आयुक्तांना पत्र पाठवले होते. तसेच शाळेत दोन मजले बांधण्याची मागणी केली होती. यावर ही जागा म्हाडाच्या अखत्यारित असल्याने बांधकाम किंवा दुरुस्तीसाठी म्हाडाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आल्याचे तत्कालीन नगरसेविका कमरजहाँ यांनी सांगितले. 

शाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाकडून छप्पर दुरुस्ती करण्यात आली होती. आम्ही प्रशासनाला पत्र लिहून याबाबत माहिती देऊ, असे मुख्याध्यापक महेंद्र पासी यांनी सांगितले.

मी जातीने लक्ष घालून गटार साफ करून घेईन; मात्र जागोजागी गटारावर नागरिकांनी बेकायदा बांधकाम केल्यामुळे नियमित साफसफाई करण्यास अडचणी येत आहेत. शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला पत्र दिले आहे. लवकरच दुरुस्ती होईल.

- सलमा अलमेलकर,  नगरसेविका, प्रभाग क्रमांक ४८