थोरल्या भावाकडून धाकट्या भावाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई - घरखर्चाला पैसे न दिल्याने थोरल्या भावाने धाकट्या भावाच्या डोक्‍यात क्रिकेटच्या बॅटने प्रहार करून त्याचा खून केला. दादर पूर्वेला असलेल्या नायगावमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव कालिदास ऊर्फ अजय मकवाना (वय 35) असे आहे. तो दादर पूर्व येथील नायगाव परिसरातील न्यू बीडीडी चाळ नंबर 5 मधील खोली क्रमांक 50 मध्ये आई मधुबाई (वय 75) आणि भाऊ मुकेश मकवाना (वय 27) यांच्यासह राहत होता. घरखर्चाच्या पैशांबाबत दोन भावांमध्ये शनिवारी रात्री भांडण झाले. कालिदासने क्रिकेटच्या बॅटने मुकेशला मारहाण केली. त्यात मुकेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मुकेशची आई मधुबाई हिने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कालिदास पसार झाला होता. गुन्हे शाखेच्या कक्ष- 4 चे पथक त्याचा शोध घेत होते. अखेर रविवारी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.