प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी नेहरू तारांगणात प्रयोगशाळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

मुंबई - कुतूहलाच्या जगात वावरणाऱ्या मुलांना विज्ञानाकडे वळवावे, यासाठी "नेहरू तारांगण'तर्फे लवकरच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. पाचवीपर्यंतच्या मुलांसाठीही प्रयोगशाळा सुरू करावी, तिथे मुलांनी त्यांच्या आवडीचे प्रयोग करावेत आणि विज्ञान समजून घ्यावे, यासाठी नेहरू तारांगण प्रयत्न करत आहे. या मुलांना शिकवणाऱ्या शाळांतील शिक्षकांशी बोलून या उपक्रमाची दिशा आणि प्रयोग निश्‍चित करण्यात येतील, अशी माहिती नेहरू तारांगण संस्थेचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली.

माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग शिकवण्यासाठी यंदा प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. तिथे शालेय अभ्यासक्रमातील प्रयोग शिकवण्यात येत आहेत. सुटीच्या दिवसांत येथे सुरू केलेल्या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हा उपक्रम वर्षभर राबवण्याचे प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती परांजपे यांनी दिली.