नेवाळी विमानतळ आंदोलन चिघळण्यासाठी पोलिस जबाबदार : नागरिकांचा हल्लाबोल 

नेवाळी विमानतळ आंदोलन चिघळण्यासाठी पोलिस जबाबदार : नागरिकांचा हल्लाबोल 

डोंबिवली : कल्याण- नेवाळी विमानतळाच्या जागेवरून शेतकऱ्यांनी 22 जून रोजी नेवाळी नाका परिसरात हिंसक आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी गुरुवारी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या  जाहीर सभेत बहुतांश वक्त्यांनी नेवाळी आंदोलन चिघळण्यासाठी पोलिस जबाबदार असून, अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत पोलिसांवर हल्लाबोल केला. सभेदरम्यान उपास्थित असलेल्या नागरिकांनी खुलेआम व्यासपीठावरील राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्याने यावेळी अनेकदा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मुंबई , ठाणे , रायगड , पालघर जिल्हा येथील आगरी ,कुणबी,कोळी समाज कृती संघर्ष समितीच्या वतीने ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या सभेला खासदार कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड,रुपेश म्हात्रे,सुभाष भोईर ,विवेक पाटील ,कोळी समाजाचे नेते अनंत तरे, कुणबी समाजाचे नेते विश्वनाथ पाटील,आगरी समाजाचे नेते राजाराम साळवी ,स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे ,काँग्रेसचे नेते संतोष केणे यांच्यासह मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील अनेक समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

अन् जगन्नाथ पाटील भडकले...
स्वातंत्र्यामध्ये गुलामीची अवस्था वाटत आहे. आगरी, कुणबी प्रत्येक समाजाचे प्रबोधन थांबवण्यात आले. जमावबंदी आदेश म्हणजे आमच्या हक्कांवर गदा आहे. 1933 ते 1939 याच समाजाने हातात हात घालून स्वातंत्र्याचा लढा लढला. त्यानंतरच कसेल त्याची जमीन कायदा अस्तित्वात आला. भूतकाळातील राजांना वर्तमानात भिकारी बनवलं आहे. आम्ही निवडुन दिलेले प्रतिनिधी हे समाजाचे प्रतिनिधी नाहीत. असते तर आपल्यावर ही वेळ नसती आली नसती असे वक्तव्य आपल्या भाषणात नागोठणे येथील रोशन पाटील या युवकाने  केल्याने व्यासपीठावर असलेले भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील भडकले आणि त्यांनी नेवाळी विषयावर बोला असे या युवकाला सुनावले. मात्र, उपस्थित तरुणांनी रोशनला बोलू द्या असा आग्रह केला. 

नेवाळी परिसरात वृक्षारोपण करून उपयोग काय? वृक्षारोपण करण्याऐवजी आमच्या लोकांना बाहेर काढा. वृक्षारोपण केल्यानंतर त्याची देखभाल करणारा कोण आहे? पोलिसांनी आमच्या नातेवाईकांना सोडले नाहीतर आम्ही पोलीस स्टेशनला धडक देऊ.
- कल्पना जाधव, नेवाळी रहिवासी

आंदोलनाची दिशा ठरवली पाहीजे. एकाच व्यक्तीवर वेगवेगळे गुन्हे ही पोलिसांची नीती साफ नाही. आपण पोलिसांविरोधात न्यायालयीन लढा लढू शकतो. भाल मधील वातावरण चिघळयाला पोलिसच कारणीभूत आहेत. पोलिसांनी महिला आंदोलकांना मारहाण केली. त्यानंतर आंदोलनाचा उद्रेक झाला. 
जगन्नाथ पाटील, माजी मंत्री, भाजप

आपण भूमीपुत्र म्हणून याठिकाणी आलो आहोत. आपण एकत्र राहिले पाहीजे. आपली लढाई पोलिसांशी नाही. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व प्रयत्न करू. या सर्व गोष्टी शांततेने सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन केली पाहीजेत. लवकरात लवकर संरक्षण मंत्र्यांबाबत आपण बैठक लावण्यासाठी प्रयन्तशील. या विषयात राजकारण घुसवण्याचे काम करू नका. एकत्र काम करूया.
- कपिल पाटील, भाजप खासदार 

शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यालाच दिली पाहिजे. मुंबई ही आगरी, कोळी बांधवांची. सरकार कोणतेही असो अन्याय फक्त शेतकऱ्यांवरच झालाय. हे आंदोलन उपोषण करून भागणार नाही. सरकारला पुन्हा एकदा रक्त हवे असेल तर हा समाज युद्धाला तयार आहे. सांडलेले रक्त वाया जाऊ देणार नाही. रक्तरंजित क्रांती घडवणाऱ्या आंदोलनाची आखणी करा.
- शाम म्हात्रे, जेष्ठ कामगार नेते 

या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने पोलिसांचा स्वाभिमान दुखावला. एका माणसाला मारण्यासाठी 4 - 4 माणसे ठेवण्यात आली आहेत. मी माझ्या लोकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून राजकारण सोडावेसे वाटत आहे. एकाच आरोपीवर 3-3 ठिकाणचे गुन्हे दाखल. एकदाच त्यांना गोळ्या घाला आणि शहीद करावे. अमानुषपणे मारहाण करण्यापेक्षा त्यांना गोळ्या घाला. पोलिसांचा स्वाभिमान दुखावत असेल तर 50 हजारांसाठी तुमचा स्वाभिमान कसा काय विकता? पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारांत काय फरक आहे. नेवाळीचे आंदोलक गुन्हेगार नाही. पोलिसांना पैसे पाहिजे म्हणून जो व्यक्ती सापडेल त्याला पकडले जात आहे. आपण पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार. माझ्या कार्यकर्त्यांना पोलीस धमकावत आहेत. पोलिसांची मनमानी आहे. आरोपींना धकमावले जातेय की मारहाणीबाबत कोणाला सांगितले तर अजून मारू. जनतेने कायदा हातात घेतला।तर पोलिसांना किती महागात पडेल हे महातींनाही. उद्यापर्यंत यांची काम थांबली नाही तर पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार. आपण एकत्र येत नाही तोपर्यंत अन्याय सुरू राहणार. 
- आमदार गणपत गायकवाड, कल्याण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com