'एनआयए', पश्‍चिम रेल्वेला खुलासा करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर झालेली चेंगराचेंगरीची घटना दहशतवादाचा प्रकार असू शकतो, असा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि पश्‍चिम रेल्वेच्या प्रशासनाला दिले.

फैजल बनारसवाला यांनी दाखल केलेल्या फौजदारी जनहित याचिकेवर न्यायाधीश भूषण गवई आणि संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुंबई शहर-उपनगरांमधील रेल्वेस्थानकांतील पुलांची अवस्था बिकट आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे मंत्रालयाने योजना आखाव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेदरम्यान अनेक अफवा पसरवण्यात आल्या. त्यामुळे या घटनेमागे दहशतवादी वृत्तीचा सहभाग असू शकतो, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या मुद्द्यावर खंडपीठाने "एनआयए' तसेच, पश्‍चिम रेल्वेला नोटीस बजावण्याच्या सूचना करतानाच याचिकेत उपस्थित केलेल्या आरोपांबाबत भूमिका मांडण्याचे निर्देश दिले. याचिकेवर तीन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेत 23 प्रवासी मृत्युमुखी, तर 39 जण गंभीर जखमी झाले होते.