मैदानांवर राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - मैदानांमध्ये राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम नकोच, असे मत 94 टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. 422 एकरच्या मैदानांचा ताबा श्रीमंतांच्या क्‍लबकडे आहे. त्यांचा वापर शहरातील एक टक्‍क्‍यापेक्षा कमी नागरिक करत आहेत, असे निष्कर्ष ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने काढले आहेत. 

मुंबई - मैदानांमध्ये राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम नकोच, असे मत 94 टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. 422 एकरच्या मैदानांचा ताबा श्रीमंतांच्या क्‍लबकडे आहे. त्यांचा वापर शहरातील एक टक्‍क्‍यापेक्षा कमी नागरिक करत आहेत, असे निष्कर्ष ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने काढले आहेत. 

ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने मुंबईतील मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच नागरिकांची मतेही जाणून घेतली. फाऊंडेशनचा हा अहवाल मंगळवारी (ता. 10) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रकाशित होणार आहे. मुंबईतील तीन हजार 780 हेक्‍टर मोकळ्या जागांपैकी एक हजार 322 एकर जागा पालिकेच्या मालकीच्या आहेत; तर क्‍लब आणि जिमखान्यांकडे 422.5 एकर भूखंड आहेत. शहरातील संपूर्ण मोकळ्या जागांपैकी 11 टक्के जागा क्‍लब आणि जिमखान्यांकडे आहेत. याचा वापर एक टक्‍क्‍यापेक्षा कमी नागरिक करत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. 

मुंबईतील 713 नागरिकांची मते फाऊंडेशनने जाणून घेतली. 400 नागरिक फक्त चालण्यासाठी मैदानांचा वापर करत असल्याचे या सर्वेक्षणात आढळले. फाऊंडेशनच्या सायली उदास मंकीकर, द्वीप राचच आणि मुंबई फर्स्टचे गौतम कीर्तने यांनी हा अहवाल तयार केला आहे. 

मोकळ्या जागा आवश्‍यक 
नागरिकांसाठी मोकळ्या जागा ठेवणे 1988 च्या कायद्यानुसार पालिकेवर बंधनकारक आहे; मात्र मोकळ्या जागांवर उद्याने किंवा मैदाने विकसित करणे बंधनकारक असायला हवे. त्याचबरोबर मोकळ्या जागा विविध प्राधिकरणांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या नियोजनासाठी एक समिती स्थापन करण्याची शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे. 

मोकळ्या जागा 
- 50 ते 70 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची मैदाने, उद्याने फक्त चार 
- एक हजार ते दोन हजार चौरस मीटरच्या मोकळ्या जागा 203 
- 500 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या मोकळ्या जागा 85 
- पाच ते दहा चौरस मीटरच्या जागा 108