वाघिणीची प्रसूती लांबल्याने वनाधिकारी पडले गोंधळात

नेत्वा धुरी
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिजली या वाघिणीच्या प्रसूतीची तारीख उलटूनही तिने बछड्याला जन्म न दिल्याने वनाधिकारी गोंधळले आहेत. दुसरीकडे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्याच गोंधळामुळे प्रसूतीची चुकीची तारीख निश्‍चित करण्यात आली, असा प्राणिमित्र संघटनांचा आरोप आहे.

उद्यानातील वाघांची संख्या वाढावी, या उद्देशाने गेल्या वर्षी नागपूरहून बिजली व मस्तानी या वाघिणींना आणले होते. या वाघिणींची जोडी उद्यानातील यश व आनंद या वाघांसोबत जमली. बिजली आणि यश यांचे तीन महिन्यांपूर्वी मिलन झाले. हे मिलन 21 ते 30 एप्रिलदरम्यान झाल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी नोंदवला. मात्र मिलनाची विशिष्ट तारीख नोंदण्यात वनाधिकाऱ्यांनी चूक केल्याचा प्राणिमित्रांचा दावा आहे.

सर्वसाधारणपणे मिलन यशस्वी झाल्यानंतर 90 ते 100 दिवसांत वाघिणीची प्रसूती होते. त्या आधारे एप्रिलमध्ये या जोडीचे मिलन झाल्याने 95 दिवसांचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी बांधला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बिजलीची प्रसूती होण्याची शक्‍यता असल्याचे उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितले होते; मात्र ऑगस्टचा तिसरा आठवडा उजाडला तरीही बिजलीची प्रसूती झालेली नाही.

टॅग्स