ओखी गुजरातकडे; मुंबईत डिसेंबरच्या पावसाचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुंबई- शहर आणि परिसरात मंगळवारीही (ता.५) ओखी चक्रीवादळाची दहशत होती. सकाळीच पाऊस सुरू झाला. जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे अनेक नोकरदारांनी कार्यालयाला दांडी मारली; परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता, तरीही काही ठिकाणी पाणी साचले. मुलांना सुटी दिल्याने शाळांमध्ये किलबिलाट नव्हता. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. लोकलमध्ये नेहमीची रेटारेटी नव्हती. शिवाजी पार्क मैदानावर पाणी साचल्याने महापरिनिर्वाण दिनी अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांचे हाल झाले. महापालिकेने शिवाजी पार्कवर उभारलेला मंडप रात्री कोसळल्याने तीन जण जखमी झाले.

मुंबई- शहर आणि परिसरात मंगळवारीही (ता.५) ओखी चक्रीवादळाची दहशत होती. सकाळीच पाऊस सुरू झाला. जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे अनेक नोकरदारांनी कार्यालयाला दांडी मारली; परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता, तरीही काही ठिकाणी पाणी साचले. मुलांना सुटी दिल्याने शाळांमध्ये किलबिलाट नव्हता. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. लोकलमध्ये नेहमीची रेटारेटी नव्हती. शिवाजी पार्क मैदानावर पाणी साचल्याने महापरिनिर्वाण दिनी अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांचे हाल झाले. महापालिकेने शिवाजी पार्कवर उभारलेला मंडप रात्री कोसळल्याने तीन जण जखमी झाले. वादळ गुजरातकडे सरकल्याने मुंबईवरील त्याची दहशतही कमी झाली आहे.

रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत
शहरात आणि उपनगरात आज मध्यम ते हलक्या सरी कोसळल्या. विशेष म्हणजे, पावसातही रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत होती; परंतु दृश्‍यमानता कमी असल्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. विमानांची वाहतूक ४० मिनिटे उशिराने सुरू होती.

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ५) हाय अलर्ट देण्यात आला होता. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली.चक्रीवादळाच्या दहशतीमुळे सकाळपासूनच शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी होती. रेल्वेस्थानकांच्या परिसरातही रिक्षा आणि टॅक्‍सी तुरळक होत्या. शाळांना सुट्टी जाहीर केल्याने रस्त्यावर स्कूल बसची वर्दळ नव्हती.  धुक्‍यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली होती. गाड्या २० मिनिटे उशिरा धावत होत्या. पश्‍चिम रेल्वेची वाहतूक ५ ते १० मिनिटे उशिराने सुरू होती. मध्य रेल्वेच्या १७ तर पश्‍चिम रेल्वेच्या सात लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

डिसेंबरच्या पावसाचा विक्रम
ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मंगळवारच्या मुंबईच्या पावसाने नवा रॅकोर्ड केला. मुंबईत ३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. १२ डिसेंबर १९६७ रोजी मुंबईत ३१.४ मि.मी. पाऊस झाला होता. डिसेंबरमध्ये पडलेला ५० वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे.

अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टीला ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे धडका देत होते. समुद्र खवळलेला होता. अतिउत्साही पर्यटकांना प्रतिबंध करण्यासाठी किनारपट्टी भागांत तटरक्षक दलाचे जवान, पालिका अधिकारी आणि पोलिस तैनात करण्यात आले होते.

मुंबई परिसरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. सकाळी पाऊस सुरू झाला, परंतु वादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे मुंबई परिसरातील पावसाचा जोरही कमी झाला. दुपारी पावसाने काही काळ विश्रांती घेतली. 
सायंकाळनंतर पुन्हा तो सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याची संततधार सुरू होती.

Web Title: mumbai news okhi move to gujrat