‘ऑलिव्ह रिडले’चे रहस्य उलगडणार

‘ऑलिव्ह रिडले’चे रहस्य उलगडणार

मुंबई - थंडीच्या हंगामात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दाखल होणाऱ्या ऑलिव्ह रिडले या कासवाच्या प्रजातींचे रहस्य उलगडण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्ल्यूआयआय) पुढाकार घेतला आहे. हे कासव कुठून येतात आणि कुठे जातात याबाबतचे संशोधन सुरू आहे.

पश्‍चिम किनारपट्टीवर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले या कासवांच्या प्रजातीवर डब्ल्यूआयआय या केंद्रीय वन विभागाच्या संस्थेतील विद्यार्थी पीएच.डी. करणार आहेत. या संशोधनाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती डब्ल्यूआयआयच्या सुमेधा कोरगावकर यांनी दिली.

एरव्ही दक्षिण कोकणात ऑलिव्ह रिडले दिसतात; मात्र काही वर्षांपासून मुंबई किनाऱ्यावरही त्यांचे दर्शन होते. जहाजांच्या धडकेमुळे या प्रजातीच्या कासवांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मुंबई किनाऱ्यावरही सापडले आहेत. थंडीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी हे कासव पश्‍चिम किनारपट्टीवर येतात. त्यांची संख्या सुमारे १०० असते, परंतु ते नेमके कुठून येतात आणि मार्चमध्ये उन्हाचे चटके बसू लागले की ते कुठे जातात हे अद्यापही रहस्यच आहे. याबाबत सुमेधा कोरगावकर संशोधन करणार आहेत. पुढील तीन वर्षे या विषयावर संशोधन होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक निधीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑलिव्ह रिडलेमध्येही फरक
पूर्व किनारपट्टीवर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या ही पश्‍चिम किनारपट्टीवर येणाऱ्या कासवांच्या तुलनेत अधिक आहे. त्यांच्या स्वभावातही फरक आहे. पूर्व किनारपट्टीचा भूभाग मोठा आहे, त्या मुळे अंडी घालण्यासाठी ऑलिव्ह रिडले कासवांना पुरेशी जागा मिळते. पूर्वेकडील समुद्रावरील मानवी अतिक्रमणही पश्‍चिम किनारपट्टीच्या तुलनेत कमी आहे.

मानवी हस्तक्षेपाचा परिणाम
जहाजांच्या धडकेमुळे मुंबईनजीकच्या समुद्रात ऑलिव्ह रिडलेंच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. दक्षिण कोकणात ऑलिव्ह रिडलेंना अंडी घालण्यासाठी सोईच्या असलेल्या एका चौपाटीवर मानवी अतिक्रमण वाढले असल्याने त्याचा फटका बसतो असे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com