आदेशाविरोधात विश्‍वास पाटील उच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - मालाड येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए) कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उपनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी विश्‍वास पाटील, तसेच त्यांच्या पत्नीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात पाटील दाम्पत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पाटील यांच्यासह विकसक रामजी शहा आणि रमेश कनाकिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेचा विषय बुधवारी न्या. रणजीत मोरे यांच्या खंडपीठापुढे उपस्थित करण्यात आला; मात्र याचिकेवर सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे आता नव्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होईल. या प्रकरणात आम्ही नियमबाह्य काहीही केले नाही. याबाबतचा एक दावा लघुवाद न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आमच्याविरोधात आकसाने आरोप केलेले आहेत, असा खुलासा पाटील यांनी याचिकेत केला आहे.

विकसकाचा फायदा होईल, अशा पद्धतीने सरकारी जमिनीचे अधिकार त्याला देण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. त्यानंतर या कंपनीत त्यांच्या पत्नी चंद्रसेना यांना संचालक म्हणून नेमण्यात आले होते, असा आरोप पाटील यांच्यावर आहे.