माजी शिक्षणमंत्र्याचे ओरिएंटल महाविद्यालय अडचणीत

माजी शिक्षणमंत्र्याचे ओरिएंटल महाविद्यालय अडचणीत

मुंबई विद्यापीठाचीही सत्यशोधन समिती गठीत

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी शिक्षण मंत्री जावेद खान यांच्या ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीचे सानपाडा नवी मुंबई येथील महाविद्यालय बेकायदेशीर असल्याची तक्रार मा. कुलगुरु, मुंबई विद्यापीठ यांच्याकडे मागील आठवड्यात केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नोलॉजी विरोधात डॉ. एम. ए. खान, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांनी त्रीसदस्यीय सत्यशोधन समितीची नेमणूक केली आहे.

या त्रीसदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर गडदे, सी. के. टी. महाविद्यालय, पनवेल यांचे नेमणूक करण्यात आली असून, प्राचार्य डॉ.सुरेश उकरंडे, सोमैया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नोलॉजी, सायन, व प्राचार्य डॉ. रवी देशमुख, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, कर्जत यांचा या सत्यशोधन समितीत समावेश आहे. या चौकशी समितीला सदर महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी करून, तात्काळ आपला वस्तुस्तिथी दर्शक अहवाल मुंबई विद्यापीठास सादर करावयाचा असल्याचे नवी मुंबई मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सदर शिक्षण संस्थेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय (अकरावी/बारावी) आणि पदवी महाविद्यालय, बी. फार्मसी आणि एम.फार्मसी, बी.एड. महाविद्यालय, विधी महाविद्यालय हे सर्व एक एकर जागेमध्ये (G+7) मजल्यांच्या एकाच इमारतीमध्ये सुरु आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण संचालनालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र इमारत असणे बंधनकारक आहे. सदर महाविद्यालयात सेमीनार रूम, लेक्चर रूम, लायब्ररी, प्रयोगशाळा, संगणक रूम नियमानुसार नाही. तसेच सदर महाविद्यालयामध्ये निकषानुसार अध्यापक वर्ग/कर्मचारी वर्ग नाही. महाविद्यालयात हेल्थ केअर सुविधा नाहीत, तसेच उपहारगृह सुद्धा महापालिकेच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करून सुरु केलेले आहे. जिमखानाच्या नावावर दोन कॅरम बोर्ड आणि एक तुटलेले टेबल टेनिस बोर्ड ठेवण्यात आल्याचे नवी मुंबई मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी  प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनीसुद्धा सदर महाविद्यालयाविरोधात आपली एक चौकशी समिती नेमलेली आहे आणि आता मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून ही दुसरी चौकशी समिती या महाविद्यालयावर नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे माजी शिक्षण मंत्री जावेद खान यांचे सदर ओरिएंटल महाविद्यालय अडचणीत सापडल्याचे शैक्षणिक वर्तुळात बोलले जात आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा सदर महाविद्यालयाला महापालिकेच्या जागेवर  दोन हजार स्क्वेअर फुटाचे पत्रा शेडचे अनधिकृत बांधकाम करून त्यात चारशे स्क्वेअर फुट जागेवर कॅन्टीन (उपहारगृह) सुरु असल्याबाबत अतिक्रमणाची नोटीस बजावलेली आहे व ३२ दिवसांत ते काढून टाकण्यात यावे अन्यथा ते महापालिकेतर्फे निष्कासित करण्यात येईल, असेही आपल्या नोटीसीत म्हटल्याचे नवी मुंबई मनविसे उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे व सनप्रीत तुर्मेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com