रेशनिंगच्या शेवई खाद्याला बुरशी; बालकांच्या जिवाशी खेळ

नीरज राऊत
मंगळवार, 4 जुलै 2017

पालघरचे महिला बाल विकास अधिकारी राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बुरशी आलेल्या शेवई पाकिटासंदर्भात तक्रार प्राप्त नसल्याचे त्यांनी सांगितले.

पालघर : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात देण्यात येणार्‍या टीएचआर (होम रेशन) खाद्यातील ‘शेवई’ खाद्याला बुरशी लागल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. प्रथमतः या टीएचआरचे सेवन करण्यास ग्रामीण बालके उत्सुक नसताना बुरशी युक्त खाद्य दिल्याने कुपोषणाच्या छायेत असलेली मूल आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील अनेक बालकांना त्या त्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकेकडून टेक होम रेशन अर्थात टीएचआर पुरविले जाते. प्रति दिवस 130 ग्रॅमचा आहार या पद्धतीने जून महिन्यात ‘पौष्टिक शेवई’ पुरविण्यात आल्या असून या शेवईना बुरशी आल्याचे दिसून आले आहे. महालक्ष्मी महिला गृहउद्योग व बाल विकास बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे 12 जून 2017 SEW3 या बॅचमधील शेवय्या पुड्यांना बुरशी आल्याचे दिसून आले. याबाबत श्रमजीवी संघटनेने याबाबत तक्रार केली आहे.

विक्रमगड व वाडा तालुक्यात वितरित करण्यात आलेल्या शेवयांची पाकिटामधील खाद्य हे उत्पादन केल्याच्या तारखेपासून चार महिन्यांपर्यंत उपयोजनाची अंतिम कालावधी असताना 20 जूनच्या सुमारास वितरित झालेले 260 ग्रॅमच्या पाकिटांमधील खाद्य हे बालकांना देण्यास अयोग्य असल्याचे श्रमजीवी संघटनेचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद पवार यांनी पत्रकारांना सांगितले. एकीकडे शासनाच्या पूरक पोषण आहाराकरिता खर्च झालेली रक्कम शासन हे संबंधितांना देत असताना बुरशीयुक्त पोषण आहार पुरविला जातो ही ग्रामीण भागातील बालकांची शासनाने केलेली चेष्टा असल्याचे ते पुढे म्हणाले. याविषयी पालघरचे महिला बाल विकास अधिकारी राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बुरशी आलेल्या शेवई पाकिटासंदर्भात तक्रार प्राप्त नसल्याचे त्यांनी सांगितले. तरीदेखील याप्रकरणी चौकशी न करण्याची त्यांनी तयारी दर्शविली. अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे हाताळणीदरम्यान पाकिटांमध्ये दमट हवा शिरल्यामुळे असा प्रकार काही निवडक ठिकाणी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.