पल्लवी पूरकायस्थचा मारेकरी काळ्या यादीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई - वकील पल्लवी पूरकायस्थ हिचा मारेकरी सज्जाद मुगल याला कैद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे चांगल्या वागणुकीबद्दल इतर कैद्यांना मिळणाऱ्या सवलती त्याला मिळणार नाहीत.

मुंबई - वकील पल्लवी पूरकायस्थ हिचा मारेकरी सज्जाद मुगल याला कैद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे चांगल्या वागणुकीबद्दल इतर कैद्यांना मिळणाऱ्या सवलती त्याला मिळणार नाहीत.

शिक्षा भोगणाऱ्या सज्जादला पॅरोलवर सोडल्यानंतर तो परत न आल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते. तो अनेक महिने पोलिसांना गुंगारा देत होता. अलीकडेच त्याला जम्मू-काश्‍मीरमध्ये अटक करण्यात आली.
एखाद्या कैद्याची वागणूक चांगली असेल तर महिन्याकाठी शिक्षेतील सात दिवस कमी होतात. वागणुकीच्या वार्षिक अहवालानुसार शिक्षेतील आणखी 30 दिवस कमी केले जातात. म्हणजे दरवर्षी शिक्षेत सुमारे 114 दिवसांची सूट मिळते. ही सवलत सज्जादला मिळणार नाही. त्याचे नावही नाशिक तुरुंगातील माफी नोंदवहीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याबाबतचा एक अहवाल 14 वर्षांनंतर सरकारला पाठवण्यात येतो. अहवालातील निरीक्षणे आणि शेऱ्यानुसार संबंधित कैद्याला तुरुंगातून सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येतो. पण सज्जाद पॅरोलवर असताना पळाल्याने त्याला कमीतकमी 25 वर्ष तुरुंगात काढावी लागतील. तसेच नियम तोडणाऱ्या कैद्यांच्या हाताला लाल रंगाची पट्टी बांधण्यात येते. ती पट्टी सज्जादच्या हातालाही बांधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासही सज्जादला प्रतिबंध करण्यात येणार आहे.

वडाळा येथे राहणाऱ्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीवर सज्जादने 9 ऑगस्ट 2012रोजी बलात्काराचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार करताच त्याने तिची हत्या केली. मुंबई पोलिसांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात त्याला जेरबंद केले. जुलै 2014 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर त्याला नाशिक तुरुंगात ठेवण्यात आले होते. फेब्रुवारी 2016 मध्ये आई गंभीर आजारी असल्याचे सांगून त्याने तिला भेटण्यासाठी 30 दिवसांची सुटी घेतली; परंतु तो परतला नाही. अखेर 10 ऑक्‍टोबरला श्रीनगरमधून त्याची गठडी वळण्यात आली.