परळ-एल्फिन्स्टन रेल्वेमार्गावरील पाण्याचाही निचरा

परळ-एल्फिन्स्टन रेल्वेमार्गावरील पाण्याचाही निचरा

मुंबई - पावसाळ्यात हमखास छातीएवढ्या पाण्यातून वाट काढायचे ठिकाण म्हणजे परळ रेल्वेस्थानक. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेची वाहतूक हमखास अडली जाते ती परळ-एल्फिन्स्टन स्थानकांदरम्यान पाणी साचल्यामुळे. पण, यंदा हे चित्र बदलण्यासाठी मुंबई महापालिका आणि पश्‍चिम-मध्य रेल्वे एकत्रितपणे काम करत आहे. रेल्वे रूळाखालून गेलेल्या पर्जन्य जलवाहिनीच्या विस्तारीकरणाचे महत्त्वपूर्ण काम यंदा हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वीच ते पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

महापालिकेच्या एफ दक्षिण विभागातून म्हणजे परळ स्थानक पूर्वेपासून रेल्वे रूळाखालून ७५० मिमी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी जी दक्षिण विभागात एल्फिन्स्टन पश्‍चिमेपर्यंत जाते. सद्यस्थितीला त्या जलवाहिनीदरम्यान मॅनहोल वा इन्स्पेक्‍शन चेंबर नाही. म्हणून पावसाळ्यापूर्वी पर्जन्य जलवाहिनीमधील पाहणी व गाळ काढणे शक्‍य होत नाही. गाळामुळेच दोन्ही स्थानकांच्या रेल्वेमार्गात पाणी साचते आणि लोकल सेवा ठप्प होते. दोन्ही स्थानकांच्या ट्रॅकदरम्यान ६०० मिमी व्यासाच्या पर्जन्य जलवाहिनीचे बॉक्‍स ड्रेनमध्ये रूपांतर करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा पूर्णपणे होण्यास मदत होईल, असा महापालिका अधिकाऱ्यांचा विश्‍वास आहे. महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी संयुक्तपणे काही बैठका घेऊन पाहणी दौराही केला आहे. शिवाय अतिरिक्त मॅनहोलचे कामही हाती घेण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ३१ मेपूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ठेवले आहे.

यंदा रेल्वेमार्गात पूरस्थिती नाही 
रेल्वेमार्ग टाकल्यापासून ५० वर्षांहून अधिक काळात पर्जन्य जलवाहिनीचे विस्तारीकरण झाले नव्हते. नाल्याचे पाणी जमा होण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता; पण आता ओपन ड्रेनचे काम सुरू झाल्याने यंदाच्या वर्षी दिलासा मिळेल. पाणी साचण्याचा विषय सुटणार आहे. दोन मार्गांमध्ये तीन पाईपची स्वच्छता करणे आणि कल्व्हर्टचे बॉक्‍स ड्रेनमध्ये रूपांतर करणे महत्त्वाचे काम आहे. मॅनहोल आणि इन्स्पेक्‍शन चेंबर उभारल्याने नियमित पाहणीसाठी त्याचा उपयोग होईल. दरवर्षी पाणी साचून निर्माण होणारी पूरस्थिती यंदा दिसणार नाही, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या उपविभागीय अभियंत्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com