ऑपरेशन परळ

ऑपरेशन परळ

मुंबई - दरवर्षीच्या पावसाळ्यात हमखास पाणी साचणारे मुंबईतील ठिकाण म्हणजे हिंदमाता... हिंदमाताची अशी ओळख पुसण्यासाठी महापालिकेने यंदा शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. परळ हिंदमाता परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या विस्तारीकरणाचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत किमान ५० टक्के साचणाऱ्या पाण्याचा तत्काळ निचरा होईल याची खबरदारी महापालिकेकडून घेण्यात येत आहे. केईएम रुग्णालय परिसरात साचणारे पाणीही यंदा दिसणार नाही. त्यासाठी ‘मिशन मोड’मध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत.

पालिकेच्या ‘स्टॉर्म वॉटर ॲण्ड ड्रेन मॅनेजमेंट’ विभागाने हिंदमाता परळ परिसरात साचणाऱ्या पाण्यासाठी एफ साऊथ विभागाला काही सूचना केल्या आहेत. तशाच काही उपाययोजनाही करायला सांगितल्या आहेत. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये पर्जनवाहिन्यांच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती एफ साऊथ विभागाचे सहायक आयुक्त किशोर देसाई यांनी दिली. हिंदमाता परिसरापासून ब्रिटानिका पंपिंग स्टेशनदरम्यानचे अंतर सहा किलोमीटर आहे. तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या कामात सध्याच्या पर्जन्यवाहिन्यांचे रूपांतर बॉक्‍स ड्रेनमध्ये करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी दोन ठिकाणची कामे पावसाळ्याआधीच पूर्ण करण्याचा विडा महापालिकेने उचललला आहे. ब्रिमस्टोवॅड अहवालाच्या धर्तीवर त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

दोन महिन्यांत  आठ डम्पर गाळ 
दरवर्षी महापालिका परळ हिंदमाता परिसरात मॅनहोलमधून गाळ उपसण्याचे काम एप्रिलमध्ये हाती घेते; पण यंदा डिसेंबर २०१७ पासूनच त्याची सुरुवात झाली आहे. डिसेंबर ते जानेवारी अशा अवघ्या दोन महिन्यांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मिळून ११५ क्‍युबिक मीटर म्हणजे आठ डम्पर भरतील एवढा गाळ काढला आहे.

हिंदमाता परळ भागाची लोकसंख्या सव्वा लाख आहे. तब्बल १२ रुग्णालय परिसरात असल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ये-जा परिसरात असते. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय कमी व्हावी असा आमचा उद्देश आहे, असे किशोर देसाई म्हणाले.

जुन्या विटांचे बांधकाम असलेल्या पर्जन्यवाहिन्यांची दुरुस्ती करत त्या ठिकाणी बॉक्‍स ड्रेनच काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल. गेल्या वर्षी २९ ऑगस्टला ३०० मि.मी. पाऊस झाला होता. त्या वेळी पाण्याचा निचरा होण्यास जवळपास १७ तास लागले होते. पर्जन्यवाहिन्या मोठ्या केल्यानंतर निम्म्या वेळेत पाण्याचा निचरा होईल. आम्ही हे आव्हान स्वीकारले आहे, असे पर्जन्य वाहिन्या विभागाचे सहायक अभियंता संजय मोहिते म्हणाले. 

पर्जन्य जलवाहिन्यांच्या विस्तार जवळपास नऊ फुटांनी होईल. विस्तारीकरणाच्या ७०० मीटरच्या अंतरातील कामातला पहिला टप्पा १५० मीटरचा आहे. परळ टीटी जंक्‍शनमध्ये कामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती मोहिते यांनी दिली. बेस्ट, महानगर गॅस आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेडसारख्या कंपन्यांनी आपल्या गॅस, वीज आणि दूरध्वनी वाहिन्यांबाबत सहकार्य करणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com