नेरूळमध्ये ‘नो पार्किंग’ची ऐशी की तैशी

नेरूळमध्ये ‘नो पार्किंग’ची ऐशी की तैशी

नेरूळ - नेरूळमध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यात ‘नो पार्किंग’मध्येही मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जात आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार पालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर घडत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे स्पष्ट होते. या बेकायदा पार्किंगमुळे शहरात दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

नेरूळ रेल्वेस्थानकासमोर सेक्‍टर २१ मध्ये पालिका आयुक्त निवास आहे. तेथून पोलिस ठाणे, सीवूडस्‌ रेल्वेस्थानक व इतर भागांतील नागरिकांची व वाहनांची ये-जा सुरू असते. हा रस्ता मोठा असल्याने रेल्वे प्रवासी तेथे वाहने उभी करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधून चालण्याशिवाय पर्याय नाही. पालिकेने येथे अनेक ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. शिवाय वाहतूक पोलिसही कारवाई करत नाहीत. त्यामुळे निर्ढावलेले वाहनचालक चक्क आयुक्त निवासाजवळ नो पार्किंगमध्ये वाहने उभी करतात.

सीवूडस्‌ येथील आलिशान सीवूडस्‌ सेंट्रल मॉलमध्ये पार्किंगची सोय असतानाही मॉलमध्ये येणारे नागरिक तेथील रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील रस्त्यावरही ‘नो पार्किंग’चे फलक आहेत. तरीही तेथे शाळेच्या बस व इतर वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी असतात. त्यामुळे येथे अनेकदा अपघात झाले आहेत. नेरूळ रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेला दुकाने, दवाखाने, हॉटेल व कार्यालये आहेत. त्यामुळे तेथील रस्त्यावरही दुतर्फा वाहने उभी असतात. सेक्‍टर १० मधील पदपथावर फेरीवाले आहेत. तेथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय पादचाऱ्यांचीही गैरसोय होते.

कोंडी टाळण्याचे उपाय
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेस्थानकासारख्या परिसरातील रस्त्यांवर ‘नो पार्किंग’चे फलक लावणे गरजेचे आहे. तेथे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाईची गरज आहे. राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. तेथे दररोज लहान-मोठे अपघात होतात. या ठिकाणी सिग्नल किंवा वाहतूक पोलिस तैनात करणे गरजेचे आहे. शाळेच्या बस रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्या शाळा सुटल्यावर शाळेच्या मैदानावर उभ्या केल्या पाहिजेत.

‘नो पार्किंग’चे फलक लावलेल्या ठिकाणी वाहने उभी केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. काही दिवस फिफाच्या बंदोबस्तामुळे कर्मचारी नव्हते. त्यामुळे कारवाईचा वेग मंदावला होता, परंतु आता पुन्हा वेगाने कारवाई सुरू होईल.
- श्‍याम शिंदे,  वाहतूक पोलिस निरीक्षक, नेरूळ-पूर्व

आयुक्त निवासासमोरील रस्त्यावर आणि डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत. तेथील बेकायदा पार्किंगवर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण ठेवायला हवे. याबाबत वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

ज्या ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक आहेत, त्या ठिकाणी कारवाई केली जाते. सीवूडस्‌ सेंट्रल मॉलजवळ ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यासाठी पालिकेला कळवले आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस तैनात केले जातात.
- नंदकुमार कदम,  वाहतूक पोलिस उपनिरीक्षक, नेरूळ पश्‍चिम

बेकायदा पार्किंग व कोंडीची ठिकाणे
 नेरूळ रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेला पदपथ आणि रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्याने दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होते.

 सीवूडस्‌ सेंट्रल मॉल परिसरातील रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी असतात. त्यामुळे रेल्वे प्रवासी, नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
 

नेरूळ सेक्‍टर १० मध्ये बैठ्या चाळी आहेत. तेथे पार्किंगची सोय नसल्याने रेल्वे स्थानकापासून साईबाबा हॉटेलपर्यंत मोठ्या प्रमाणावर पार्किंग केले जाते. यामुळे जुईनगरकडे जाणाऱ्या वाहनांना दररोज सायंकाळी कोंडीचा फटका बसतो.

 डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर ‘नो पार्किंग’मध्येही पार्किंग केले जाते. येथे सायंकाळी मोठ्या प्रमाणावर शाळेच्या बस उभ्या केल्या जातात.

 सेक्‍टर ४ मधील ग्रेट ईस्टर्न गॅलरीमध्ये पार्किंगची सोय नसल्याने येथील कार्यालयात काम करणारे कर्मचारी या इमारतीमधील सारस्वत बॅंकेच्या समोर पदपथावर आणि रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे विद्यार्थी व पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधून चालावे लागते.

 सीवूडस्‌मधील डी मार्टमध्ये येणारे ग्राहक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत असल्याने सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com