तक्रारदाराचा वाढदिवस पोलिस ठाण्यात साजरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

उपनिरीक्षक तांडेल यांनी अनिशची व्यक्तिगत माहिती घेतली असता अनिशचा वाढदिवस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अनिशला सरप्राइज देण्यासाठी केक आणि मिठाई मागवण्यात आली आणि तक्रार घेता घेता पोलिसांनी वाढदिवसही साजरा केला

मुंबई - तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाढदिवस चक्क पोलिस ठाण्यात साजरा झाला. साकीनाका पोलिसांच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मुंबई पोलिसांच्या ट्‌विटर हॅंडलवरून या वाढदिवसाचे फोटो अपलोड झाले आहेत.

नागरिकांच्या मनातील पोलिस ठाण्याबाबतची भीती दूर करण्यासाठी गृह विभाग विविध उपक्रम हाती घेत आहे. साकीनाना येथील रहिवासी अनिश जैन शनिवारी (ता.14) वाहन अपघाताची तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात गेला. तेथील अधिकाऱ्यांनी त्याची तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. उपनिरीक्षक तांडेल यांनी अनिशची व्यक्तिगत माहिती घेतली असता अनिशचा वाढदिवस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अनिशला सरप्राइज देण्यासाठी केक आणि मिठाई मागवण्यात आली आणि तक्रार घेता घेता पोलिसांनी वाढदिवसही साजरा केला.