पोलिसांच्या गैरप्रकारांची ध्वनिफीत व्हायरल

अनिश पाटील
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

महिला पोलिस अधिकाऱ्याचे आरोप; एसीपीमार्फत चौकशी

महिला पोलिस अधिकाऱ्याचे आरोप; एसीपीमार्फत चौकशी
मुंबई - सायबर पोलिसांचे कथित गैरप्रकार चव्हाट्यावर मांडणारी एक ध्वनिफीत व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सायबर पोलिस ठाण्यातील काही अधिकारी गैरप्रकार करत असल्याचा आणि पुण्यातील एका छाप्यात हाती लागलेली लाखोची रोकड व सोने सायबर पोलिसाने लंपास केल्याचा आरोप एका महिला अधिकाऱ्याने या ध्वनिफितीत केला आहे.

ही 14.08 मिनिटांची ध्वनिफीत "सकाळ'च्या हाती लागली आहे. ही ध्वनिफीत म्हणजे दूरध्वनीवरील संभाषण आहे. वाहतूक विभागातील कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे हवालदार सुनील टोके यांना ही महिला अधिकारी दूरध्वनीद्वारे सायबर पोलिस ठाण्यातील कथित गैरप्रकारांची माहिती देत असल्याचे आढळते. दरम्यान, या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही चौकशी एक महिला सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) करत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला अधिकाऱ्याने आपल्या वाहनचालकाला टोके यांच्या घरी पाठवले आणि त्याला दूरध्वनी करून टोके यांच्याशी संभाषण केले, असे सूत्रांनी सांगितले. गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छत्रछायेमुळे काही अधिकारी अनेक वर्षे सायबर पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत. ते सर्व जण गैरप्रकार करत आहेत, असा आरोप ध्वनिफितीत करण्यात आला आहे.

वरिष्ठ पदाच्या वादातून आरोप?
या ध्वनिफितीमुळे पोलिस दलातील अंतर्गत वाद आणि गैरप्रकार पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. ध्वनिफितीतील आवाज सध्या सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत नसलेल्या एका वरिष्ठ पोलिस निरीक्षक महिलेचा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तिने आपली ओळख लवण्यासाठी दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी करून तो रेकॉर्ड केला असावा, असा एक कयास आहे. सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदाच्या वादातून हे आरोप करण्यात आले आहेत का, याचीही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.