अपहारप्रकरणी 'पीडब्लूडी'च्या कार्यकारी अभियंत्यांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई - अनुदानात 13 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) कार्यकारी अभियंता पी. के. पाटील यांच्या विभागीय चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 2008-09 मध्ये औरंगाबादमध्ये असताना त्यांनी हा गैरव्यवहार केल्याचे आर्थिक ताळेबंदाच्या तपासणीतून उघड झाले आहे.

राज्य सरकारने दिलेल्या खर्च नियंत्रणाच्या आदेशांचे पालन न करता त्यांनी अर्थसंकल्प नियमावली व "पीडब्ल्यूडी' लेखासंहिता नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 च्या नियम 3 चा भंग केला आहे. त्यांनी केलेले बचावासाठी निवेदन आणि सादर केलेले दस्तावेज पाहता ते दोषी ठरत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. डिसेंबर 2005 ते ऑक्‍टोबर 2008 या कालावधीत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी मे. प्रतिभा कन्स्ट्रक्‍शन, औरंगाबाद वर्ग- 5 मध्ये नोंदणी देताना अनियमितता केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. प्रतिभा कन्स्ट्रक्‍शनचे प्राप्तिकर विवरणपत्र आणि सनदी लेखापाल यांचा ताळेबंद, करारनामे, यंत्रसामुग्रीचे खरेदी खत यांची खातरजमा पाटील यांनी केली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सादर केलेल्या चौकशी अहवालावरील असहमतीची कारणे विचारात घेता पाटील यांच्यावर दोषारोप सिद्ध होत असल्याचे सांगत त्यांचे वेतन चार टप्प्यांनी सहा महिन्यांसाठी कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआदेशाविरोधात त्यांना राज्यपालांकडे अपील करण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.