भ्रष्टाचाराच्या आरोप मुक्तीसाठी राधेशाम मोपलवारांकडे दहा कोटी खंडणीची मागणी

radheshyam mopalwar
radheshyam mopalwar

ठाणे : राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्यासाठी त्यांच्याकडून दहा कोटीची खंडणी मागणाऱ्या सतीष मांगले आणि त्याची पत्नी श्रध्दा मांगले यांना ठाणे पोलीसांनी रंगेहात अटक केली. डोंबिवलीच्या पलावा सीटीमध्ये राहणाऱ्या या दांपत्याने राधेशाम मोपलवर यांना ब्लॅकमेल करून दहा कोटींची रक्कम मागीतली होती. परंतु ती रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर 31 आॅक्टोबर रोजी फोन करून त्यांनी सात कोटी रुपयांची रक्कम खंडणी म्हणून देण्याचे कळवले होते. या फोनचा संवाद मोपलवार यांनी ठाणे पोलीसांना दाखवल्यानंतर ठाणे पोलीसांचा एक पोलीस कर्मचारी एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन डोंबिवलीतील मांगले यांच्या घरी गेला होता. या सापळ्यामध्ये मांगले दांपत्य सापडले असून त्यांचे अन्य दोन साथीदार फरार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाचे सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्या विरोधात सतीष मांगले या व्यक्तीने भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यासाठी त्यांच्याकडून एक ध्वनीफितही प्रसिध्द करण्यात आली होती. ही ध्वनीफित विविध माध्यमांनी प्रशारित केली होती. तर सतीष मांगले याची पत्नी श्रध्दा मांगले विविध राजकीय पक्षांच्या राजकीय नेत्यांना भेटून तसेच प्रसार माध्यमांकडे सातत्याने जाऊन मोपलवार यांच्याविरुध्द आरोप करित होत्या. तसेच शासकिय कार्यालयांमध्येही या दांपत्याने मोपलवार यांच्या विरोधात तक्रारी केल्याची माहिती ठाणे पोलीसांनी दिली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक असताना मोपलवार यांच्यावर झालेल्या अशा प्रकारच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून त्यांच्याकडून त्यांची तपासणी सुरू आहे. त्याच काळात 23 आॅक्टोबर रोजी सतीष मांगले, श्रध्दा मांगले आणि त्यांचा मित्र अनिल वेदमेहता यांनी मोपलवार यांच्या ओळखीच्या क्लिंग मिश्रा यांच्यामार्फक संपर्क साधून नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे भेट घेतली. त्यावेळी मोपलवार यांच्या विरोधातील सर्व आरोप परत घेण्यासाठी तसेच त्याच्याकडील सर्व ध्वनीफिती परत करण्यासाठी त्याने मोपलावर यांच्याकडे दहा कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर शांघरीला हाॅटेल, वरपे भिवंडी येथेही पुन्हा चर्चाकरून मागणी कायम ठेवली होती. त्यानंतर 31 आॅक्टोबर रोजी मुंबईतील जे. डब्ल्यू. मेरीअट कॅफे हाॅटेलमध्ये या दांपत्याशी भेट घेतल्यानंतर 7 कोटी रुपयांची तडजोड करण्यात आली होती. हे सात कोटी न दिल्या पोलीसांकडे तक्रार करून मोपलवर यांची मुलगी तन्वी हिच्या जीवाला धोका निर्माण करण्याची धमकी या आरोपींनी दिली होती. त्यासाठी त्यांनी गवळी टोळीचे नाव पुढे केले होते. हा फोनवरील संवाद मोपलवार यांनी पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून या दांपत्याला डोंबिवली पलावा येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त गुन्हे मकरंद रानडे. पोलीस उप आयुक्त गुन्हे सुनिल भारद्वाज, सहा. पोलीस आयुक्त शोध दोन एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांनी ही कारवाई पार पाडली. 

मोपलवारांच्या घटस्फोटाच्या काळात आरोपीशी ओळख...
राधेशाम मोपलवार आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू झाल्यानंतर मोपलवार यांनी प्रायवेट डिटेक्टीव्हचे काम करणाऱ्या आरोपी सतीष मांगले यांची मदत घेतली होती. तेव्हापासून सतीष मांगले मोपलवार यांच्या संपर्कात होता. दहावी शिकलेला सतीष याने काॅम्प्युटर मध्ये डिप्लोमाचे शिक्षण सुरू केले परंतु तेही अर्धवट सोडून देऊन तो डिटेक्टीव्हचे काम करत होता. तेव्हापासून मोपलवार यांचे फोन रेकाॅर्ड करण्याची सवय त्याला लागली होती. या फोन रेकाॅर्डमध्ये तांत्रिक गफलती करून त्याने ती ध्वनीफित प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचवली होती. यापुर्वीही त्याने असे प्रकार केले असून बांद्रा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मिरारोड येथील एका बलात्काराच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली. त्याची पत्नी श्रध्दा मांगले ही त्याची दुसरी पत्नी असून ती चित्रपट अभिनेत्रीही आहे. गुरूवारी खंडणीचे एक कोटी तीनेच स्विकारले होते. ते सध्या डोंबिवलीतील मानपाडा-निळजे येथील लोढा पलावा मधील रिव्हर व्ह्यु एफ या इमारतीमध्य सतराव्या मजल्यावर भाड्याने राहत होते. खंडणी विरोधी पथकाने त्यांना रंगेहात पकडून दोन लॅपटाॅप, 5 मोबाईल हॅण्डसेट, 4 पेनड्राईव्ह, 15 सीडी. आणि अन्य अक्षेपार्ह कागदपत्रे जमा करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे पोलीसांकडून देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com