रेल्वे अपघातातील भरपाईसाठी दांपत्य 25 वर्षे प्रतीक्षेत!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - रेल्वे अपघातातील दांपत्याला नऊ लाख रुपये व्याजासह देण्याचे आदेश मुंबई ग्राहक पंचायतीने दिले; मात्र 2006 च्या या आदेशाला पश्‍चिम रेल्वेने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारणात अपील केल्याने हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. या दांपत्याने भरपाईसाठी 1993 मध्ये याचिका केली असून, 25 वर्षांपासून ते भरपाईच्या प्रतीक्षेतच आहेत.

तीन वर्षांच्या मुलीला पाळणाघरात सोडून विनया आणि विलास सावंत नेहमीप्रमाणे कामाकरिता त्यांच्या कार्यालयात निघाले होते. 28 सप्टेंबर 1992 ला जोगेश्‍वरी रेल्वे स्थानकाला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग अचानक कोसळला आणि या दांपत्यासह आणि काही प्रवासी थेट लोहमार्गावर पडले होते. या दुर्घटनेनंतर विनया यांच्या मणक्‍याला गंभीर दुखापत झाली. विनया यांच्यावर उपचारासाठी 18 लाख रुपये खर्च झाले. कुटुंबीयांनी केलेली मदत आणि वैयक्तिक गुंतवणुकीमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र उपचाराचा खर्च परवडेनासा झाल्याने त्यांनी 1993 मध्ये ग्राहक तक्रार निवारण मंचात याचिका केली.

पश्‍चिम रेल्वेने उपचारासाठीचे नऊ लाख रुपये व्याजासह या दांपत्याला द्यावेत, असे आदेश ग्राहक पंचातीने 2006 ला दिले; मात्र त्यानंतरही भरपाई न मिळाल्याने त्यांनी याबाबत पश्‍चिम रेल्वेकडे विचारणा केली. त्यावर 2006 च्या ग्राहक ग्राहक पंचायतीच्या आदेशाविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अपील केल्याचे समजले. एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील प्रवाशांना वेळीच मदत मिळावी, आपल्यासारखी त्यांची वाताहत होऊ नये, अशी इच्छा त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.