गर्दी नियमन करण्यात रेल्वे पोलिस अक्षम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

सक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह; प्रशिक्षणाची गरज

मुंबई: एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलावरील गर्दीचे आकलन आणि नियमन करण्यात रेल्वे पोलिस अपयशी ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी दुर्घटना घडल्यास तिला तोंड देण्यास रेल्वे पोलिस सक्षम आहेत का, असा प्रश्‍नही या निमित्ताने उभा राहिला आहे.

सक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह; प्रशिक्षणाची गरज

मुंबई: एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलावरील गर्दीचे आकलन आणि नियमन करण्यात रेल्वे पोलिस अपयशी ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी दुर्घटना घडल्यास तिला तोंड देण्यास रेल्वे पोलिस सक्षम आहेत का, असा प्रश्‍नही या निमित्ताने उभा राहिला आहे.

एल्फिन्स्टन आणि परळ ही दोन स्थानके जोडणाऱ्या या पुलावरून परळ स्थानकाकडे जाणारा जिना अरुंद असून त्यावर नेहमीच गर्दी असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी या जिन्याच्या दोनही टोकांना दोन-दोन पोलिस उभे राहून गर्दीचे नियमन करतात. मात्र काल ही गर्दी दहापट वाढल्यावर आलेला आणीबाणीचा प्रसंग हाताळण्यात पोलिस अपयशी ठरले. पोलिसांनी गर्दीत मिसळून अफवा पसरवणाऱ्यांना किंवा हुल्लडबाजी करणाऱ्यांना शोधणे अपेक्षित असते; परंतु काल पोलिस सपशेल अपयशी ठरले.

स्थानकातील सीसी टीव्हीवर पोलिसांनी लक्ष ठेवले असते तर पाऊस आल्याने प्रवासी पुलाच्या आडोशाला उभे राहिले आहेत आणि त्यामुळे प्रचंड गर्दी होत आहे हे त्यांना दिसले असते. अशा वेळी गर्दीला एल्फिन्स्टन रोड स्थानकावर उतरवायचे की रिकाम्या असलेल्या परळच्या तीन व चार क्रमांकाच्या फलाटांवर उतरवायचे याचा निर्णय पोलिसांनी घेतला असता. मात्र एरवी फेरीवाल्यांशी "अर्थ'पूर्ण चर्चा करण्यात किंवा गप्पा मारण्यात रमणाऱ्या रेल्वे पोलिसांना हे का जमले नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

आणीबाणीच्या वेळी पुलांवर आणि फलाटांवर प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी होण्याची भीती निर्माण झाली तर अनर्थ टाळण्यासाठी प्रसंगी रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्याबाबत काही सूचना द्यायच्या का, याचा निर्णयही स्टेशन मास्तरांच्या समन्वयाने घेणे आवश्‍यक असते. मात्र किती पोलिस स्थानकांवर उपस्थित असतात आणि त्यांचा स्टेशन मास्तरांशी किती समन्वय असतो, अशी चर्चाही प्रवाशांमध्ये आहे.

रेल्वेची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या आरपीएफ जवानांना प्रशिक्षण देण्याची गरज वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही व्यक्त केली आहे. आरपीएफच्या जवानांची संख्या वाढवावी, त्यांना पुरेशी साधन-सामुग्री द्यावी, त्यांच्या प्रशिक्षणासाठी अकादमी सुरू करावी, अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच केली होती. "सकाळ'नेही त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

आरपीएफच्या जवानांचा फिटनेस कायम रहावा यासाठी परेड ग्राऊंड देण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी जागा आणि निधी देण्याचीही मागणी झाली होती. त्याचबरोबर रेल्वे पोलिस आणि आरपीएफ जवानांना गर्दीचे नियंत्रण आणि नियमन करण्याचेही प्रशिक्षण द्यावे, अशी मागणीही आता केली जात आहे.

Web Title: mumbai news railway police Disabled