घामाघूम मुंबईकरांना पावसाचा दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई - घामाघूम झालेल्या मुंबईकरांना मंगळवारी मध्यरात्री पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला. पावसाची सुतराम शक्‍यता नसताना मध्यरात्री अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. सकाळपर्यंत मनसोक्त कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. रात्रीत 103.2 मिलिमीटर पाऊस झाला. 

काही दिवसांपासून घामाच्या धारांनी चिंब होणाऱ्या मुंबईकरांना बुधवारची सकाळ गारवा देणारी ठरली. पावसाच्या हजेरीमुळे तापमानही घसरले. बुधवारी कमाल तापमान 30.5; तर किमान तापमान 23.6 अंश सेल्सिअसवर पोचले. सकाळी सात वाजेपर्यंत मुंबईतील विविध ठिकाणी पावसाचा मारा सुरू होता. वरळी, चेंबूर, कुर्ला, भांडूप, मुलुंड, कूपर रुग्णालय परिसर, दिंडोशी, वांद्रे आदी भागांत चांगला पाऊस झाला. दुपारी पुन्हा उकाडा जाणवायला सुरवात झाली. मात्र काही दिवसांपेक्षा मंगळवारी उन्हाचा दाह कमी होता. सायंकाळीही गारव्यामुळे मुंबईकरांना हायसे वाटले. मात्र उद्या (ता. 14) पासून पुन्हा तापमानात वाढ होण्यास सुरवात होईल, अशी शक्‍यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे.