पावसाळ्यात झाडांची छाटणी सुरू

पावसाळ्यात झाडांची छाटणी सुरू

नवी मुंबई - झाडांच्या फांद्या छाटणीची पावसाळ्यापूर्वीची कामे नवी मुंबई महापालिकेने चक्क पावसाळ्यात सुरू केली आहेत. सध्या पाम बीच मार्गासह कोपरखैरणे, वाशी, ऐरोली व नेरूळ या भागांत झाडांची छाटणी सुरू आहे. पालिकेचा हा कारभार म्हणजे वरातीमागून घोडे असा आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने या कामात दिरंगाई झाल्याचे स्पष्टीकरण पालिकेकडून केले जात आहे. दरम्यान, चारपाच दिवस पडलेल्या पावसात शहरात ३१ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

नवी मुंबई शहरात सुमारे साडेनऊ लाख झाडे आहेत; दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी झाडांच्या लोंबणाऱ्या फांद्यांची छाटणी केली जाते. पावसाळ्यात जोरदार वारा व विजांचा कडकडाट असल्यामुळे झाडे कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून झाडांची आधीच छाटणी केली जाते; मात्र मे महिन्यात नवी मुंबईतील झाडांची छाटणी करण्यास दिरंगाई झाल्याने ऐन पावसाळ्यात जूनच्या अखेरीस झाडांची छाटणी करण्यास सुरुवात झाली आहे. कोपरखैरणे, ऐरोली, वाशी व नेरूळ भागात रस्ते व पदपथांच्या कडेला असलेल्या झाडांची छाटणी करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेने यंदा उशिराने झाडे छाटणीचे काम सुरू केल्याने त्याचा फटका काही मोठ्या झाडांना बसला आहे. छाटणीअभावी झाडांच्या झुकलेल्या फांद्यांचे वजन वाढल्याने तीन दिवसांत तब्बल ३१ झाडे उन्मळून पडल्याची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. यात काही ठिकाणी झाडांखाली वाहने सापडल्याने त्यांचे नुकसान झाले. शहरातील रहदारीच्या पाम बीच मार्गालगतच्या झाडांची छाटणी करण्याचा मुहूर्त प्रशासनाला मिळाला आहे. सध्या या मार्गावरील दुभाजकांमध्ये वाढलेल्या झाडांची छाटणी सुरू आहे. पावसाळ्यात झाडांच्या वाढलेल्या फांद्या वाऱ्यामुळे रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळे वाहनचालकांनी मागणी केल्यानंतर छाटणी सुरू केली.

छाटणीसाठी तीन लॅडर व्हॅन!
शहरात असलेल्या साडेनऊ लाख झाडांची छाटणी करण्यासाठी महापालिकेकडे अवघ्या तीन लॅडर व्हॅन आहेत. झाडांना पाणी देणाऱ्या टॅंकरवरील चालकांकडूनच लॅडर व्हॅनवर काम करून झाडांची छाटणी केली जाते. झाडांना पाणी देण्याचे काम झाल्यानंतर दिवसभरातील उरलेल्या तासांमध्ये झाडे छाटणीची कामे करता येतात. त्याचा परिणाम छाटणीवर झाला आहे.

महापालिकेकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे झाडे छाटणीच्या कामाला वेळ लागला आहे; मात्र लवकरात लवकर झाडे छाटणीची कामे पूर्ण करता येतील. झाडांच्या मुळाशी जास्त माती नसल्यामुळे ती पडतात.
- तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com