रमेश उपाध्याय यांना जामीन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबई - मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटप्रकरणी लष्कराचे निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. याप्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वी जामीन मंजूर झाला असल्याचे कारण देत, समानतेच्या (पॅरिटी) तत्त्वावर हा जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, हमी म्हणून एक लाख रुपये जमा करण्याचा व दोन जामीनदारांची हमी सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

मालेगाव बॉंबस्फोटाचा कट रचण्याचा आरोप रमेश उपाध्याय यांच्यावर ठेवला होता. तसेच या प्रकरणातील इतर सहआरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकांना उपस्थित राहिल्याचा ठपकाही उपाध्याय यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ठेवला होता. उपाध्याय यांच्या अटकेनंतर प्रसाद पुरोहितला अटक झाली होती. ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यापेक्षा उपाध्याय यांचा स्फोटातील सहभाग किती होता, असा सवाल न्या. रणजित मोरे आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने विचारला होता. त्याला उत्तर देताना, उपाध्याय यांचे वकील सुदीप पासबोला आणि "एनआयए'च्या वकील संदेश पाटील या दोघांनाही त्या तुलनेत कमी, असे उत्तर दिले होते. तरीही उपाध्याय यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना, उपाध्यायच्या सहभागाबाबत काही मुद्‌द्‌यांवर न्यायालयाचे लक्ष वेधायचे आहे, असा युक्तिवाद "एनआयच्या'वतीने करण्यात आला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापुढे आमचे हातही बांधले आहेत, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने उपाध्याय यांना जामीन मंजूर केला. उपाध्याय या प्रकरणातील दहावे आरोपी होते. याच बॉंबस्फोट प्रकरणातील समीर कुलकर्णी आणि राकेश धावडे हे दोघेही जामीन अर्ज करण्याच्या तयारीत आहेत.