लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचा इन्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण; पाच आरोपींना 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्येच्या हत्येप्रकरणी तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकरसह पाचही आरोपींना रविवारी 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीत आरोपींनी लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे खंडण केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण; पाच आरोपींना 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्येच्या हत्येप्रकरणी तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकरसह पाचही आरोपींना रविवारी 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीत आरोपींनी लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे खंडण केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

23 जुलैला मंजुळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे आहे.

शनिवारी सायंकाळी अटक झालेल्या पोखरकर यांच्यासह महिला गार्ड वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. सर्वप्रथम अटक झालेली गार्ड बिंदू नायकोडे हिलाही 7 जुलैपर्यंतच कोठडी सुनावण्यात आली होती.

तक्रारदार मरियम शेखच्या तक्रारीनुसार, 23 जुलैला सकाळी बराकीच्या बाहेर मंजुळाला मारहाण झाली. त्याचा आवाज बराकीपर्यंत येत होता. मारहाणीनंतर गळ्यात साडी गुंडाळून मंजुळाला ओढत बराकीत आणले. त्यानंतर दुपारी 12 वाजता मंजुळाला बराक क्रमांक 5 मध्ये आरोपींनी मारहाण करून लैंगिक अत्याचार केला होता. मात्र, आरोपींनी चौकशीत लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे खंडन केले आहे. यासंदर्भात पडताळणी सुरू असून, गुन्हे शाखा सध्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वस्तूंचा शोध घेत आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात अहवाल आल्यावरच काही गोष्टी स्पष्ट होतील, असेही सूत्रांनी सांगितले.

...म्हणून प्रकरण चिघळले!
मंजुळाच्या मृत्यूचा फायदा घेत शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी आणि संदीप गडोली हत्या प्रकरणातील आरोपी दिव्या पाहुजा यांनी आरडाओरडा केली. "मीडिया को बुलाओ' असे इंद्राणी ओरडत होती. तिला शहनाज गलीमार, वैशाली विशाल मुडळे, कृतिका डहाळ, हसीना अजहरअली शेख, संपा निवरू रॉय, मरियम इम्रान शेख यांनी साथ दिल्याने हे प्रकरण चिघळले, असेही आरोपींचे म्हणणे आहे.