नूतनीकरणाचे काम मंडल याच्या देखरेखीखाली?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई - घाटकोपर येथील साईदर्शन इमारत दुर्घटनेप्रकरणी अटक केलेला दुसरा आरोपी अनिल मंडल याच्यावर तळमजल्यावरील नूतनीकरणाच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मुख्य आरोपी सुनील शितपने सोपवली होती, अशी माहिती उजेडात आली आहे. मंडल याला न्यायालयाने दोन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

साईदर्शन अपार्टमेंटमधील शितप याच्या मालकीच्या तळमजल्यावरील सदनिका क्रमांक 1, 2 व 3 मधील भिंती आणि इमारतीचा आरसीसी पिलर तोडून एकच मोठा हॉल बनवण्याचे काम करण्यात आले.

त्यामुळेच ही इमारत कोसळल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. बांधकाम मजुरांना मजुरीचे वाटप करणे, बांधकामासाठी माल खरेदी करणे, बांधकाम व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही याची पाहणी करण्याची कामे शितप याने मंडलला दिली होती. यात पिलर तोडण्याचे काम मंडलच्या देखरेखीखाली झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

मंडलकडे कोणतीही अधिकृत पदवी अथवा पदविका नसतानाही या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी शितपने त्याच्यावर कशी सोपवली, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. इमारतीची संरचना नेमकी कशी होती, याची माहिती घेण्यासाठी महापालिका व गृहनिर्माण संस्थांच्या निबंधकांना पत्र लिहून नकाशा, आराखडा व ब्ल्यू प्रिंटची मागणी पोलिसांनी केली आहे.