अहवालाची प्रत देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - भोसरी एमआयडीसीतील कथित जमीन गैरव्यवहारासंदर्भातील न्या. झोटिंग समितीच्या अहवालाची प्रत मिळावी, अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांनी भोसरी येथील एमआयडीसीची जमीन खरेदी केल्याचा प्रकार आपल्या निदर्शनास आला होता. त्यानंतर आपण पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला (एसीबी) गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते, असे गवंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्य सरकारनेही या प्रकरणी न्या. झोटिंग समितीची स्थापना करून स्वतंत्र चौकशी केली आहे. त्याचा अहवाल सरकारकडे सादर झाल्याचे आपल्याला प्रसारमाध्यमांतून समजले असून या प्रकरणाची वस्तुस्थिती व अहवालातील मुद्दे यांची तपासणी करण्यासाठी हा अहवाल आपल्याला मिळावा, असे गवंडे यांनी पत्रात नमूद केले आहे.