रिक्षा-टॅक्‍सी प्रवास महागणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई - रिक्षा-टॅक्‍सींच्या भाडेदराचे सूत्र ठरववण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बी. सी. खटुआ समितीने आपला 300 पानी अहवाल नुकताच सरकारला सादर केला. मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा, टॅक्‍सी सेवांसाठी किमान भाडेदरात एक रुपयांची वाढ करण्याची शिफारस तसेच ऍपआधारित टॅक्‍सी सेवांच्या चढ्या दरांवर अंकुश ठेवण्याची शिफारस या समितीने केली आहे. ऍप आधारित टॅक्‍सींसाठी चार ते पाच पटीच्या वाढीऐवजी दुप्पट भाडे वाढवण्याची शिफारसही समितीने केली आहे.

परिवहन विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. राज्य सरकारने या अहवालाला मंजुरी दिल्यानंतर रिक्षाचे भाडे किमान 18 रुपयांवरून 19 रूपये तर टॅक्‍सीचे किमान भाडे 22 वरून 23 रुपये होऊ शकेल.

मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रिक्षा, टॅक्‍सी प्रवासासाठी कोणतीही वाढ या समितीने सुचवलेली नाही. ग्रामीण भागांमध्ये रात्री 12 वाजल्यानंतर रिक्षा उपलब्ध होण्यासाठी आणि चालकांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी समितीने भाडेदर रचनेत बदल सुचवले आहेत. ग्रामीण भागांत रात्री 12 ऐवजी 11 पासून ते पहाटे 5 पर्यंत रात्रीचे दर आकारण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यामध्ये मूळ भाड्यावर 50 टक्के रक्कम अधिक आकारले जाणार असून या रचनेचा रिक्षाच्या मीटरमध्येच समावेश असेल.