रिओ ऑलिंपिकपर्यंतचा इतिहास शब्दबद्ध 

रिओ ऑलिंपिकपर्यंतचा इतिहास शब्दबद्ध 

मुंबई - निरनिराळ्या खेळांचे प्रतिनिधित्व असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांकडे अवघ्या जगाचेच लक्ष लागलेले असते. इसवी सनापूर्वीपासून अस्तित्वात असलेली ऑलिंपिक स्पर्धा, स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडू, खेळांपासून ते डोपिंगपर्यंत आणि ऑलिंपिकमध्ये होत गेलेल्या बदलांवर इत्थंभूत प्रकाश टाकणारा ऑलिंपिकचा कोश लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. इसवी सन ७७६ पासून ते थेट रिओ ऑलिंपिकपर्यंतचा वेध या कोशात घेण्यात येणार आहे. मराठी भाषेत पाच खंडांमध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धांची सुरुवात १८९६ मध्ये झाली असली, तरीही इसवी सनापूर्वीही ऑलिंपिक खेळांच्या स्पर्धा भरवल्या जात होत्या; मात्र त्याचे दस्ताऐवजीकरण झालेले नव्हते. आता इसवी सन ७७६ पासूनची माहिती कोशामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्थेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोगदेव या संपूर्ण कोशाचे संपादन करत आहेत. 

ऑलिंपिकच्या खेळांमध्ये वाढ होत ते २९ वर गेले आहेत. पूर्वी जिथे केवळ २५० खेळाडूंचा सहभाग होत असत. आता त्यांची संख्या १२ हजारांवर पोहोचली आहे. आत्तापर्यंत झालेल्या ३१ ऑलिंपिक स्पर्धांची इत्थंभूत माहिती वाचकांना मराठीतून मिळावी, यासाठी या कोशाची निर्मिती करण्यात येत आहे. साधारण एक हजार पृष्ठ संख्या असलेल्या पाच खंडांमध्ये ऑलिंपिकच्या संदर्भातील प्रत्येक घडामोडी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या रिओ ऑलिंपिकपर्यंतचा तपशील असला, तरीही प्रत्येक चार वर्षांनी स्पर्धेनंतर माहितीची भर घालण्यात येणार आहे. प्रत्येक खंडाचे स्वतंत्र संपादक असून, संजीव शाळगावकर, मनोज देवळेकर, महेश देशपांडे, विजय लोणकर आणि भगवान दातार पाच खंडांचे संपादन अनुक्रमे करतील. 

ऑलिंपिक संदर्भातील इत्थंभूत माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचावी म्हणून कोशाची निर्मिती करण्यात येत आहे. कोश पूर्ण होण्यास १८ महिने लागणार असून, त्याची पहिली बैठक नुकतीच पार पडली आहे. खेळाडू, कोच, डॉक्‍टर, पत्रकार आदींनीही त्यांचे अनुभव शब्दबद्ध करावे, असे आवाहनही केले जाणार आहे. 
- हेमंत जोगदेव (कोशाचे मुख्य संपादक)

असे असतील पाच खंड
पहिला खंड प्राचीन असून इसवी सन पूर्वपासूनची स्पर्धा आणि स्वरूप देण्यात येणार आहे. पूर्वीच्या काळी डॉक्‍युमेंटेशनची पद्धत नव्हती; मात्र इसवी सन ७७६ पासूनचे स्पर्धेचे तपशील देण्यात येणार आहेत. दुसऱ्या खंडामध्ये ऑलिंपिक ज्या शहरांमध्ये झाली, त्या त्या स्पर्धेच्या दरम्यानच्या पूर्व घडामोडी, पुरुष-स्त्री स्पर्धक, स्पर्धकांना आलेल्या अडचणी एकूण स्पर्धेचे स्वरूप देण्यात येणार आहे. तिसरा खंड खेळांवर आधारित आहे. सध्या २९ खेळ असले तरी त्यांच्यात टप्प्याटप्याने वाढ झाली आहे. त्यावर एकूण दृष्टिक्षेप टाकण्यात येणार आहे. चौथ्या खंडात पदकांचे तपशील देश आणि खेळाडूच्या नावासकट देण्यात येणार आहेत. पाचवा खंड अत्यंत महत्त्वाचा असून, ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने इंटरनॅशनल ऑलिम्पिक अकॅडमीपासून ते डोपिंगपर्यंत जे ऑलिंपिकच्या दरम्यान गाजले त्यांच्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com