मुंबईतील सुविधांबाबत सचिन तेंडुलकरच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मुंबई - नद्या, तलाव आणि समुद्रकिनारे यांच्या स्वच्छतेचा आदर्श मुंबईने देशापुढे ठेवावा. मैदानी खेळ विसरलेल्या तरुणाईसाठी मैदानांची निर्मिती करा. रस्ते व त्यांच्या बांधकाम साहित्याचा दर्जा खराब असल्याने रस्ते सुविधा सुधारण्यावर भर द्यावा, अशा सूचना खासदार सचिन तेंडुलकरने केल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हा आराखडा 2025 साठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी या सूचना केल्या आहेत.

डंपिंग ग्राऊंडची भयावह समस्या सोडविण्यासाठी घराघरांत कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर महापालिकेने भर द्यावा. रेनवॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या इमारतींना करसवलत द्यावी, तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या क्‍लस्टर समूहांना जादा सवलत द्यावी. नद्यांमध्ये सर्वच प्रकारचे सांडपाणी मिसळत असते. नद्यांसह सर्वच जलस्रोत स्वच्छ राहिले पाहिजेत, असे सांगत या पत्रात त्यांनी जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेचे उदाहरण दिले आहे. सर्व समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी विशिष्ट लक्ष्य निर्धारित करा व त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घ्या, असेही सुचविण्यात आले आहे.

आज इंटरनेटमुळे तरुणाई मैदानी खेळ विसरली आहे, त्याचे दुष्परिणाम मोठे असल्याने मुलांच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी मैदानांची निर्मिती करावी. यात सायकल ट्रॅक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, त्यामुळे मोनो मेट्रो वा रेल्वेस्थानके येथून घरी जाण्यासाठी भाड्याच्या सायकली ठेवाव्यात; पण बीकेसीमधील सायकल ट्रॅक नष्ट होऊन तेथे वाहनांचे पार्किंग व कचरापेट्या आल्या आहेत, याकडेही लक्ष द्यावे. शहराच्या पूर्व किनारपट्टीवर मोठी क्रीडांगणे तसेच सायकल चालविण्यासाठी महामार्ग उभारावेत, अशीही सूचना तेंडुलकर यांनी केली आहे.

आपल्याकडील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची नितांत गरज आहे. त्यांचा व त्यांच्या बांधकामाचा दर्जा अत्यंत खराब असतो हे पाहता यास जबाबदार असलेल्या कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात यावा. रस्ते बांधताना तेथील वाहतुकीचा विचार व्हावा. खराब रस्त्यांमुळे एकही मृत्यू होऊ नये याची काळजी घ्यावी. रस्ते अपघात टाळण्यासाठी पादचाऱ्यांसह सर्व वाहनचालकांना दंड करावा. पदपाथवर वाहने उभे करणाऱ्यांनाही दंड करावा, असेही पत्रात सुचविले आहे.

सुरक्षित रेल्वे प्रवास
सर्वच रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित असावा याकडे लक्ष द्यावे. फलाट व रेल्वेचे पायदान यांच्यात जीवघेणी पोकळी नसावी, असेही पत्रात म्हटले आहे.