बिजली वाघिणीला मिळणार नवा जोडीदार

नेत्वा धुरी
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई - वाघांची संख्या वाढावी म्हणून धडपडणाऱ्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन अधिकारीच आता त्यांची जमलेली जोडी तोडणार आहेत. वाघांचे मीलन अपयशी ठरत असल्याने त्यांची जोडीच बदलण्याचा निर्णय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून गर्भवती असल्याची निव्वळ चर्चाच रंगलेल्या बिजली वाघिणीला आता नवा जोडीदार मिळणार आहे.

गेल्या जुलै महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नागपूरहून दोन वाघिणी आणण्यात आल्या. त्यांपैकी आठ वर्षांची बिजली वाघीण गर्भवती असल्याचे उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितले होते. बिजली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसूत होणार होती; परंतु तीन महिन्यांचा प्रसूती काळ लोटल्यानंतर ती गर्भवतीच नसल्याचा साक्षात्कार उद्यान प्रशासनाला झाला. बिजली आणि उद्यानात जन्मलेला यश वाघ वर्षभरापासून एकत्र राहत आहेत. त्या मीलनातूनच एप्रिलमध्ये बिजली गर्भवती राहिली असावी, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी बांधला; परंतु सप्टेंबर उजाडला तरी तिची प्रसूती झाली नाही. बिजली गर्भवती नसल्याचे जाहीर करावे लागल्याने उद्यान प्रशासनाचे चांगलेच हसे झाले. अशा अनुभवानंतर आता बिजली आणि यशची जमलेली जोडी तोडण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे. आता बिजली ‘आनंद’ वाघासोबत एकत्र राहील, अशी व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आनंद व यश हे सख्खे भाऊ उद्यानातच जन्माला आले. त्यामुळे नवा जोडीदार मिळाल्याने बिजलीवर फारसा काही फरक पडणार नाही, अशी आशा वन अधिकारी बाळगून आहेत. बिजलीसोबत नागपूरहून आणण्यात आलेल्या ‘मस्तानी’ वाघिणीला आता यश जोडीदार म्हणून मिळेल. वाघांची अदलाबदल यशस्वी होईल आणि डिसेंबरअखेरीस उद्यानात पाळणा हलेल, अशा आशेवर वन अधिकारी आहेत; मात्र नव्या जोडीबाबत उद्यान प्रशासनाने अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.

प्रसूतीनंतरच बातमी
आधीच्या घटनेत हसे झाल्याने उद्यानाचे वन अधिकारी ताकही फुंकून पीत आहेत. यंदा वाघांच्या जोडीचे मीलन झाले तरीही वाघीण प्रसूत होईपर्यंत बातमी बाहेर जाता कामा नये, अशी सक्त ताकीद वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.