मुंबई विद्यापीठात सत्यनारायण पूजा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठात ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासणीचा घोळ सुरू असतानाच कालिना संकुलातील गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये सत्यनारायण पूजा घालण्यात आल्याने हा चर्चेचा विषय झाला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे.

मुंबई विद्यापीठ हे "शांतता क्षेत्र' असताना सकाळच्या प्रहरात "गरवारे'मध्ये ध्वनिवर्धक लावून सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली. वर्ग सुरू असताना हा पूजेचा घाट कशाला, असा सवाल मनविसेने विचारला आहे. पूजा घालण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी घेतली होती का, असेही मनविसेने विचारले आहे. मनविसेचे उपाध्यक्ष ऍड. संतोष धोत्रे यांनी महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. अनिल पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

विद्यापीठात ऑनस्क्रीन असेसमेंटची समस्या सुटत नसताना प्राध्यापक पूजेत मग्न कसे राहतात, असा संताप ऍड. धोत्रे यांनी व्यक्त केला.

कायदा विषयाचा निकाल लागत नसताना कायदा विभागाने गेल्या आठवड्यात "कृतज्ञता समारंभ' केला. अजूनही कायदा विषयाचे निकाल घोषित झालेले नाहीत. अशा परिस्थितीत कार्यक्रम कसे केले जातात, असा सवाल स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी विचारला आहे. या दोन्ही प्रकरणांत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेले नाही.