आधारसाठी रखडली विवरणपत्राची छाननी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्यापूर्वी आधार क्रमांकाला पॅन कार्डशी संलग्न करणे बंधनकारक केल्यामुळे विवरणपत्र सादरीकरण प्रक्रिया (आयटीआर रिटर्न फायलिंग) संथ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ 81 लाख विवरणपत्रांची छाननी झाली आहे. अद्याप सव्वा कोटींहून अधिक विवरणपत्रांची छाननी होणे बाकी आहे. त्यामुळे विवरणपत्र भरण्यासाठी आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पॅन कार्डवरील नाव, जन्म दिनांक आणि लिंग आदी संपूर्ण माहिती आधार कार्डशी जुळणे आवश्‍यक आहे; मात्र बहुतांश करदात्यांची आधार आणि पॅन कार्डवरील माहिती जुळत नसल्याने त्यांना विवरणपत्र सादर करण्यास अडथळे येत आहेत. माहितीमध्ये सुधारणा करण्यासाठी किमान 15 दिवसांचा कालावधी लागत असल्याने विवरणपत्र भरण्यास आणि छाननीवर परिणाम झाल्याचे "टॅक्‍स2विन'चे संस्थापक अभिषेक सोनी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

आतापर्यंत 2 कोटी 33 लाख करदात्यांनी विवरणपत्र भरले आहे; मात्र त्यातील ई-व्हेरिफिकेशन जवळपास 81 लाख करदात्यांचे झाले आहे. विवरणपत्र भरण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र आधार कार्ड लिंक केलेल्या करदात्यांना 31 ऑगस्टपर्यंत विवरणपत्र सादर करता येईल, असे सोनी यांनी सांगितले. जास्तीत जास्त करदात्यांना आधार कार्ड पॅन कार्डशी संलग्न करण्यासाठी सरकार मुदतवाढ देईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.