अण्णासाहेबांच्या जयंतीनिमित्त शरद पवार यांचा सोमवारी सत्कार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

नवी मुंबई  - माथाडी कामगारांचे आराध्यदैवत आणि युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. 25) नवी मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमामुळे माथाडी कामगारांचे नेते आमदार नरेंद्र पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला नवीन वळण मिळण्याची शक्‍यता आहे. नवी मुंबईत होणाऱ्या माथाडी कामगारांच्या या मेळाव्याला दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे बडे नेते एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

दर वर्षीप्रमाणे या वेळीही महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांची जयंती एपीएमसी मार्केटमधील कांदा-बटाटा मार्केटमध्ये साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा होणार आहे. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे. माथाडी कामगारांचे अनेक प्रश्‍न आघाडी सरकारच्या काळापासून प्रलंबित आहेत. यातील काही प्रश्‍न भाजप सरकारने सोडवण्यास सुरुवात केली आहे. पवारसाहेबांना बोलावून, त्यांचा सत्कार करून त्यांना हेच दाखवून देण्याचा एक माथाडी कामगारांचा नेता म्हणून माझा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माथाडी कामगारांच्या घरांबाबत नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात त्यांनी आणखी अडीच हजार घरे देण्याचे आश्‍वासन देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. त्यांचे आभार या कार्यक्रमातून आम्हाला मानता येतील. राज्यातील या दोन दिग्गज नेत्यांना एकत्र आणून माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्‍न सोडवण्याच्या कामाला अधिक गती मिळेल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात माथाडी कामगारांसाठी मुख्यमंत्री महत्त्वाची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. 

वडाळ्यात पाच हजार घरे मिळणार 
वडाळा ट्रक टर्मिनलच्या जागेवर माथाडी कामगारांना देण्यात येणाऱ्या घरांमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी मिळालेल्या अडीच एफएसआयमुळे कामगारांना सुमारे 280 कोटी भरावे लागणार आहेत. हे परवडणारे नसल्याने आम्ही यातून तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला चार एफएसआय देऊन अडीच हजारांऐवजी पाच हजार घरे देण्याचे आश्‍वासन दिले. तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले, असे आमदार पाटील यांनी सांगितले. 

Web Title: mumbai news sharad pawar