शिवसेनेत आलास तर बक्कळ पैसा!

शिवसेनेत आलास तर बक्कळ पैसा!

मुंबई - शिवसेनेत येण्यासाठी नगरसेवक दिलीप लांडे यांनी पैशाचे आमिष दाखवले होते, अशी ऑनलाईन तक्रार मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) बुधवारी (ता.१८) रात्री केली.  

महापालिकेच्या कुर्ला येथील एल प्रभाग कार्यालयात १२ ऑक्‍टोबरला शिवसेना प्रवेशाची ऑफर लांडे यांनी दिली होती, असे तुर्डे यांनी तक्रारीत म्हटले आहे. ते सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन तक्रार अर्जही देणार आहेत. 

प्रभाग समितीची बैठक १२ ऑक्‍टोबरला होती. ती संपल्यानंतर नगरसेवक लांडे यांनी आपल्याशी शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा केली होती. सहा नगरसेवकांचा निर्णय झाला आहे. तू आमच्यात सामील झालास, तर आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही. तू तयार असशील, तर निश्‍चित रक्कम सांगू, असे आमिष लांडे यांनी आपल्याला दाखवले होते, असे तुर्डे यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपण मनसे सोडण्यास नकार दिल्यावर, ‘याबाबत कोठेही बोलू नकोस’, अशी ताकीदही लांडे यांनी दिल्याचे तुर्डे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

दरम्यान, मनसेचे नगरसेवक फुटल्यानंतर दोन दिवसांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसेने वेगाने हालचाली करून फुटीर नगरसेवकांची कायदेशीर कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले.

फुटीर नगरसेवकांची कोंडी?
मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांची कायदेशीर कोंडी करण्यास मनसेने सुरुवात केली आहे. या सहा नगरसेवकांच्या नोंदणीला आक्षेप घेणारे पत्र कोकण आयुक्तांना देण्यात आले. त्यांनतर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही करण्यात आली. बुधवारी रात्री एसीबीकडे तक्रारही करण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com