निधीवाटपावरून शिवसेना-भाजप यांच्यात जुंपणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 20) सभागृहात सादर करण्यात येणार आहे. यंदा 25 हजार 141 कोटींचा अर्थसंकल्प असून त्यात 12 हजार कोटींची कपात करण्यात आली आहे. अर्थसंकल्पाला कात्री लावून आयुक्तांनी शिवसेनेची कोंडी केल्याची चर्चा आहे. त्यावरून सभागृहातील चर्चेदरम्यान शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

गतवर्षी पालिकेचा अर्थसंकल्प 37 हजार कोटींचा होता. भांडवली खर्चाबाबत अवाजवी अंदाज वर्तवून अर्थसंकल्पाचा आकडा फुगवला जात असल्याने यंदा आयुक्त अजोय मेहता यांनी या खर्चाला कात्री लावून तब्बल 12 कोटींची कपात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात विकास निधी वाटपावरून धुसफूस सुरू आहे. पारदर्शक कारभाराचा पहारेकरी म्हणून भूमिका घेणारा भाजप शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे आयुक्तांनी आर्थिक शिस्त लावण्याच्या निमित्ताने केलेली कपात म्हणजे शिवसेनेच्या कारभारावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचाच प्रकार असल्याची चर्चा आहे. त्याचे पडसाद अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान सभागृहात उमटण्याची शक्‍यता आहे.