विकासकामांच्या श्रेयावरून शिवसेना नगरसेविका भिडल्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे आणि शीतल मंढारी या आपापसांतच भिडल्याने दिवाळीआधीच राजकीय वातावरण तापले आहे. आमदार निधीतून झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याचे समजते. त्यांच्यातील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू होती. दोघींनी रविवारी (ता. 15) रात्री कोळसेवाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. 

विजयनगर प्रभाग क्रमांक 98 मध्ये एका सोसायटीच्या आवारात आमदार निधीतून विकासकामे करण्यात आले होते. त्याबद्दल नगरसेविका माधुरी काळे यांचे अभिनंदन करणारे फलक स्थानिकांनी लावले होते. या प्रभागात सध्या शीतल मंढारी या नगरसेविका आहेत. काळे यांनी यापूर्वी या प्रभागात नगरसेविका म्हणून काम केले आहे. नागरिकांनी काळे यांचे अभिनंदन करणारे फलक लावल्याने मंढारी यांना राग आला. स्थानिकांना त्यांनी हे फलक हटवण्यास सांगितले. या वादानंतर रविवारी रात्री या दोन्ही नगरसेविका आमने-सामने आल्या. या वेळी त्यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने स्थानिक राजकारण चांगलेच तापले. दोन्ही नगरसेविकांनी एकमेकांविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नगरसेविका माधुरी काळे यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीळकंठ पाटील यांनी दिली.