शिवसेनेतर्फे ग्रामीण आमदारांना राज्यात मंत्रिपदाची संधी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - सत्तेतून बाहेर न पडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यामुळे आता आठवडाभरात होणाऱ्या राज्याच्या मंत्रिमंडळ फेरबदलात शिवसेना सहभागी होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची मंत्रिपदे काढून ग्रामीण भागातील आमदारांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

सत्तेत राहून सत्तेवर अंकुश ठेवणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जाहीर केले आहे. त्यामुळे आठवडाभरात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात शिवसेना सहभागी होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. नारायण राणे यांनी आज नव्या पक्षाची घोषणा केली. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या विस्तारात घटकपक्ष म्हणून तेही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी शिवसेनेचे आमदार राणे यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ कशी घेणार, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे भाजपचा शपथविधी झाल्यानंतर शिवसेनेचे नवे मंत्री शपथ घेण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मंत्र्याच्या फेरबदलात सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि रामदास कदम यांना बाजूला केले जाण्याची शक्‍यता आहे. देसाई यांनी आपणहून पक्षाची जबाबदारी मागितली आहे, तर कदम आणि रावते यांच्या कामावर अनेक आमदार नाराज आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद दिल्यामुळे ग्रामीण भागातून निवडून आलेल्या आमदारांमध्ये नाराजी आहे.