रायगडमधील भूमिपुत्रांना शिवसेनेचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडॉरअंतर्गत दिघी प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या गावांच्या जमिनींच्या प्रश्नावर शिवसेनेने आज पाठिंबा दिला. या भागातील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना या भागातील आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी आहे, असे आश्‍वासन शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांना विधान भवनात दिले. आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या भेटीसाठी हे शिष्टमंडळ मुंबईत आले होते. या प्रश्नांवर डॉ. गोऱ्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबतही संवाद साधला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना कायमच असून, या भागातील शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावरील शिक्के काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन रामदास कदम यांनी आज या कार्यकर्त्यांना दिले.