राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्षपदी गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. माजी अध्यक्ष संभाजीराव म्हसे-पाटील यांच्या निधनामुळे हे पद रिक्त होते. नवनियुक्त अध्यक्ष गायकवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून, यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदाचे काम पाहिले आहे.

मावळ गोळीबार प्रकरणाच्या चौकशी समितीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला होता. आघाडी सरकारच्या काळात गाजलेल्या आदिवासी विभागातील गैरव्यवहारप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाचेही ते अध्यक्ष होते. गुरुवारी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.