मूल विकण्याच्या प्रयत्नातील महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - तीन वर्षांचे मूल विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका बंगाली महिलेला वसई-माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. शगिना कुरेशी (वय 40) असे त्या महिलेचे नाव आहे. एका दक्ष महिलेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिला सापळा लावून अटक केली. शगिना कुरेशी ही वसई येथे राहते. ती कामानिमित्त नेहमी बाहेर असते. दोन महिन्यांपासून तिच्याकडे हे तीन वर्षांचे मूल आहे. हे मूल विकण्याच्या प्रयत्नात ती होती. तिची एका महिलेशी ओळख झाली होती. आपल्याकडे असलेले मूल एक लाखाला विकायचे आहे. ग्राहक असल्यास सांग, असे शगिना हिने त्या महिलेला सांगितले. सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्या महिलेने थेट माणिकपूर पोलिस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार सांगितला.