कायदा शाखेच्या विद्यार्थ्याची फरपट

नेत्वा धुरी
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कायदा शाखेच्या विद्यार्थ्यांची फरपट अजूनही सुरूच आहे. पुनर्मूल्यांकनाच्या निकाला प्रतीक्षा करावी लागत असल्याने एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा जीव टांगणीला लागला आहे. 

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कायदा शाखेच्या विद्यार्थ्यांची फरपट अजूनही सुरूच आहे. पुनर्मूल्यांकनाच्या निकाला प्रतीक्षा करावी लागत असल्याने एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा जीव टांगणीला लागला आहे. 

रेहान रेहमान मोमीद हा मूळचा जुन्नरचा. त्याचे कुटुंब शेतकरी. रेहानचा उदरनिर्वाह आणि शिक्षणही शेतीवरच. तो एलएलबीचा विद्यार्थी. तीन वर्षांपासून जोगेश्वरीच्या ईस्माइल युसूफ महाविद्यालयातील वसतिगृहात राहत होता. परंतु परीक्षा संपल्यावर त्याला लगेचच नियमाप्रमाणे वसतिगृह सोडावे लागले. आज ना उद्या निकाल लागेल, या प्रतीक्षेत त्याने दोन महिने जुन्नरला काढले. ऑगस्टच्या अखेरीस त्याचा निकाल लागला. तो नापास झाला होता. त्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला आहे. 

एलएलएमची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे; परंतु वसतिगृहाच्या प्रवेशासाठी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याने रेहानची अवस्था फारच बिकट झाली आहे. एलएलबी पासची गुणपत्रिका असेल तरच एलएलएमला आणि वसतिगृहात प्रवेश दिला जातो. परंतु रेहानचा पुनर्मूल्यांकनाचा निकालही लागलेला नाही. त्याला सोमवारी (ता.१३) पुनर्मूल्यांकनाचा निकाल मिळेल, असे आश्वासन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिले आहे.

दोन महिन्यांपासून मित्रांकडे राहत आहे. परवडत नसताना हॉटेलचे जेवण खातो. पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची वाट पाहतोय.  
- रेहान मोमीद, विद्यार्थी, कायदा शाखा