निलंबित कारागृह अधीक्षकावर आणखी एक गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - कैदी मंजुळा शेट्येच्या संशयास्पद मृत्यूनंतर तुरुंग प्रशासनाविरोधात आरोप करणारे निलंबित कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात बुधवारी ठाणे नगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंदविला. खासगी गाडीत सरकारी पैशांतून पेट्रोल भरल्याचा तसेच त्यानंतरही प्रवास भत्त्याची मागणी करून सरकारचे 9700 रुपयांचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

कारागृह विभागात कॅशिअर म्हणून कार्यरत असलेले ज्योतिराम पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हिरालाल जाधव 5 एप्रिल ते 27 ऑगस्ट 2016 या कालावधीत ठाणे तुरुंगात कार्यरत होते. त्या वेळी त्यांनी हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्या वेळी जाधव यांनी वाहनचालक व तत्कालीन कार्यरत आज्ञांकित अधिकाऱ्यावर अधिकाराचा गैरवापर करून दबाव टाकल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जाधव यांच्याविरोधात काल रात्री गुन्हा नोंदविला असल्याची माहिती ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एम. व्ही. धर्माधिकारी यांनी दिली.
दरम्यान, तुरुंग विभागाने केलेल्या अंतर्गत तपासणीत जाधव यांनी सुमारे नऊ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती लवकरच पोलिसांना देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. याबाबत जाधव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.