वाहतूक पोलिसांशी हुज्जत पडणार महागात

शेखर हंप्रस
बुधवार, 26 जुलै 2017

कोपरखैरणे - मुंबई वाहतूक पोलिसांच्या धर्तीवर नवी मुंबई वाहतूक पोलिसही वायफाय बॉडी कॅमेरा घेण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी माहिती मागवली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांसोबत गैरवर्तन केले, तर ते महागात पडणार आहे. विशेष म्हणजे यामुळे वाहतूक पोलिसांचा कारभारही पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

वाहतूक पोलिसांना मारहाण आणि शिवीगाळ करण्याचे प्रमाण वाढत आहे. असे प्रकार करणारे बहुतांश उच्चशिक्षित आणि श्रीमंत असतात. त्यांना कायद्याचे ज्ञान असते; मात्र त्यानंतरही ते वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतात. यात महिलाही आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे पोलिसबळ यांचा परिणाम वाहतूक नियमनावर होत आहे. त्यातूनही वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतात. त्या वेळी काही जण पोलिसाशी हुज्जत घालतात. काहींची मजल तर शिवीगाळ आणि मारहाण करण्यापर्यंत जाते. स्वयंचलित सिग्नलवर वाहतूक पोलिसांची गरज नसते; परंतु अशा ठिकाणी नियम मोडले जातात. एखाद्या वाहनचालकाला थांबण्याचा इशारा केला, तर तो पोलिसाच्या अंगावरही गाडी घालतो. असे प्रकार रोखण्यासाठी आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटणाऱ्या मुजोर वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिस आता वायफाय बॉडी कॅमेऱ्याचा वापर करणार आहेत.

वायफाय बॉडी कॅमेरा प्रायोगिक तत्त्वावर वापरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. या  विचाराधीन योजनेचा अभ्यास सुरू आहे. वायफाय बॉडी कॅमेरा नियंत्रण कक्षातून नियंत्रित केला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे काम केले जाणार आहे.
- नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक शाखा

 कसा आहे वायफाय बॉडी कॅमेरा? 
हा कॅमेरा वाहतूक पोलिसांच्या शर्टला पुढच्या बाजूला असतो. त्यावर कारवाई करताना वाहतूक पोलिस व समोरच्या व्यक्तीचे संभाषण रेकॉर्ड होते. त्यामुळे पोलिसांसोबत होणारे गैरवर्तनाचे प्रकार टाळता येतील; शिवाय व्यवहारात पारदर्शकता येईल.