दोन तरुणींवरील बलात्कार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई - दोन तरुणींवर बलात्कार आणि फसवणूक केल्याच्या आरोपासंबंधित एका प्रकरणाचा तपास आज मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला. पुण्यातील दोन पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप पीडित तरुणींनी केला आहे.

दिल्लीहून नोकरीच्या आमिषाने दोन मुलींना एका व्यक्तीने पुण्यात आणले होते. यामध्ये एक मुलगी अल्पवयीन आहे. मात्र नोकरीऐवजी त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात टाकण्यात आले. तेथून मोठ्या प्रयत्नाने दोघींनी स्वतःची सुटका करून पुन्हा दिल्लीला गेल्या. तेथे एका वकिलाने त्यांना दिल्ली पोलिसांकडे नेले आणि त्याच वकिलांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली. आज न्या. रणजित मोरे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. मुलींना फसविण्यामध्ये पुण्यातील दोन पोलिसांचाही समावेश असल्याचा उल्लेख याचिकेत आहे. याबाबत अमायकस क्‍युरी वकील मिहीर देसाई यांनी पीडित मुलींशी बोलून याबाबत माहिती घेतली. संबंधित उल्लेख सत्य आहे, असे आज देसाई यांनी खंडपीठाला सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे करण्याचे आदेश न्यायालयाने सीआयडी प्रमुखांना दिले असून याचिका निकाली काढली.