वालधुनी नदी, नाल्यांमध्ये सोडली घातक रसायने

दिनेश गोगी
सोमवार, 26 जून 2017

  • वालधुनी नदी, नाल्यांना पूर येताच केमिकल माफियांनी केला घात
  • उलट्या, जुलाबाचा त्रास. जीवघेण्या उग्र वासाने नागरिक घाबरले,
  • पालिका नोटीस बजावणार

 

 

उल्हासनगर : शनिवारी (24 तारखेच्या) रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदी सह नाल्यांना पूर येताच,केमिकल माफियांनी घातक रसायन पाण्यात सोडण्यात आले आहे.त्यामुळे काल रात्रभर जीवघेण्या उग्र वासाने नागरिक भयभीत झाले असून त्यांना उलटया जुलाबाचा त्रास झाला आहे.कायद्याने वागा लोकचळवळीने उल्हासनगर पालिकेच्या आपात्कालीन यंत्रणेला सोबत नागरिकांची विचारपूस केली आहे.

2015 मधील ऑक्टोंबर महिन्याच्या 27,28 तारखेला केमिकल टँकर माफियांच्या वतीने वालधुनी नदीत प्रचंड प्रमाणात घातक रसायन सोडण्यात आले होते.त्यामुळे नदी किनारी किंबहुना त्यापरिसरात राहणाऱ्या सुमारे 700 च्या वर नागरिक,महिला,मुले उग्र वासाने बाधित झाले होते. त्यांना उलट्या जुलाबाचा त्रास झाला होता. शेकडो जणांना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सोबत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेंव्हाच्या उपमहापौर पंचशीला पवार, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाइं आठवले गटाचे प्रदेश सचिव नाना पवार,नगरसेवक टोनी सिरवानी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे, रामेश्वर गवई आदीं सोबत शेकडो समाजसेवक रात्रभर नागरिकांच्या मदतीला धावले होते. याचे पडसाद उमटून पोलिसांनी काही केमिकल टँकर माफियांना अटक केली होती.

पुढे केमिकल सोडण्याचा प्रकार थांबवण्यात आला होता.मात्र अधून मधून कमी प्रमाणात रसायन सोडले जात असले तरी त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे.

काल रात्री वालधुनी नदीच्या, व नाल्यातील पुराच्या वाहत्या पाण्यात पुन्हा केमिकलचे घातक रसायन सोडण्यात आले.सम्राटअशोक नगर, संजय गांधी नगर, रेणुका सोसायटी, 3 नंबर ओटी, लालचक्की, महाराजा हॉल, हिराघाट, शांतीनगर पर्यंत उग्र वास पसरू लागताच, नागरिकांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला. रात्री मास मीडियावर विविध व्हाट्सअॅपच्या ग्रुपवर त्याचे पडसाद उमटले.नागरिकांनी विठ्ठलवाडी, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फोन करून सूचित केले. अशा वेळी कायद्याने वागा लोकचळवळ या संघटनेचे सर्वेसर्वा राज असरोंडकर, कल्पेश माने, मनोज पाटील आदींनी लालचक्की आदी परिसरात उल्हासनगर पालिकेच्या आपात्कालीन यंत्रणेचे प्रमुख बाळु नेटकेसोबत नागरिकांची विचारपूस केली. त्यांना उटलीसाठी डोमस्टाल आणि डोकेदुखीकरता क्रोसीन गोळ्या घेण्यास सांगितले.

"पालिका नोटिसी बजावणार"
याबाबत उल्हासनगर पालिकेचे मुख्यालय उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क साधला असता, मागच्या घटने प्रमाणे बाहेरच्या शहरातील केमिकल माफियांनी घातक रसायन पाण्यात सोडले असावे. तसेच रेसिडेंट किंवा सभोवताली केमिकलचे, जीन्स वॉशचे कारखाने आहेत. त्यांच्या कडून हे रसायन सोडण्यात आल्याची शक्यता आहे. त्यांना याविषयी नोटीस बजावण्यात येणार असून चौकशी केली जाणार असल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले.