भुयारी वाहनतळाचा मुंबईत मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबईतील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे, त्यावर उपाय म्हणून भायखळा आणि वांद्रे परिसरातील मनोरंजन उद्याने व खेळाच्या मैदानात भुयारी वाहनतळ सुरू केले जाणार आहे. या संदर्भात बुधवारी स्थायी समितीत सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मुंबईतील भुयारी वाहनतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईत पार्किंगची समस्या भेडसावत आहे. अनेक ठिकाणी रस्ते, पदपथ, इमारतींसमोर, चौकात जागा मिळेल तिथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. याचा नाहक त्रास पादचाऱ्यांनाही होतो. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे इतर वाहनचालकांची यातून मार्ग काढताना कसरत होते. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत सार्वजनिक वाहनतळ सुविधा कमी पडत आहे. यावर उपाययोजना म्हणून पालिकेने मनोरंजन उद्याने आणि मैदानांच्या ठिकाणी अद्ययावत भूमिगत वाहनतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

भायखळा येथील झुला मैदान, वांद्रे फोर्टच्या नजीकचा परिसर आणि वांद्रे लिंक रोडवरील रावसाहेब पटवर्धन उद्यानात भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी आराखडे तयार केले जाणार असून, महापालिकेने पाच वास्तूतज्ज्ञांची निवड केली आहे. स्थायी समितीने याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली.